राजकीय पक्षांकडून सक्षम उमेदवारांची चाचपणी मांडगाव : समुद्रपूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मांडगाव गटासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यासह मांडगाव गण आणि सुजातपूर गणासाठी इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच या प्रक्रियेला वेग आला आहे. राजकीय पक्षांकडून सक्षम संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. उमेदवरांच्या घोषणेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. जि.प. आणि पं.स. करीता जिल्ह्यात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या महिन्याच्या अखेरीस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल. यावेळी राजकीय पक्ष प्रारंभीच उमेदवारांच्या नावाची घोषणा करून प्रचाराचे रानं मोकळे करून देणार आहे. त्यामुले सर्वत्र लगबग पाहायला मिळत आहे. मांडगाव सर्कलमध्ये कॉँग्रेसतर्फे माजी जि.प. सदस्य डॉ. उमाकांत पाहुणे, नामदेव घुसे, विनोद हिवंज (समुद्रपूर) पंकज पाटील (हळदगाव) यांच्या नावाची चर्चा आहे. यासह वसंत महाजन (शेडगाव), विजय कुंभलकर, प्रमोद डफ हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जाते. तसेच सुजातपूर हण हा अनुसूचित जमाती महिला राखीव असून बेबी मसराम (देरडा), प्रिया उईके (मजरा), आशा खुडसंगे (नांद्रा) यांची नावे चर्चेत आहे. जि.प. करीता हिम्मतराव चतुर (आजदा) यांच्या नावाची चर्चा असून अनिल देशमुख, हेमंत पाहुणे, बसपाकडून रामेश्वर बरडे (बावापूर) यांचा संभाव्य उमेदवाराच्या यादीत समावेश आहे. भाजपाकडून मांडगाव गटात माजी जि.प. सदस्य सरोज माटे यांचे नाव चर्चेत आहे. गणासाठी राजू निमजे आणि सुनील डुकरे यांच्यात उमेदवारी मिळविण्यासाठी चुरस आहे. राजकीय पक्ष प्रभावी उमेदवार शोधत असल्याने अखेरच्या क्षणी कुणाला उमेदवारी दिली जाते याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. नवखे उमेदवार अनुभवी उमेदवारांपुढे किती प्रभावी ठरतात हे पाहणे महत्त्वाचे असेल. (वार्ताहर)
मांडगाव गटासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी
By admin | Published: January 23, 2017 12:50 AM