लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : सर्व फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख. तसेच आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारीच. त्याच्या सेवनाचे अनेक फायदे असल्याचे जाणकार सांगतात. परंतु, आंबा पिकविण्यासाठी सध्या घातक रसायनाचा वापर केल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनाने लक्ष देत योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.आंबा पिकविण्यासाठी घातक रासायनिक पदार्थांचा वापर होत असल्याने फळांचा राजा असलेल्या आंबा विषारी होत चालला आहे. पूर्वी आंबा पिकविण्यासाठी तणस, गवत किंवा झाडांच्या पानांचा वापर केल्या जायचा. त्यामुळे आंब्यातील नैसर्गिक गुण टिकून राहत होते. मात्र, आता झटपट आंबा पिकविण्यासाठी तसेच अधिकचा नफा कमविण्यासाठी होत असलेल्या स्पर्धेत आंब्यातील नैसर्गिक गुणधर्म लुप्त होत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. आंबा कृत्रिम पद्धतीने पिकविण्यासाठी रासायनिक पावडरचा वापर करीत असल्याने मानवाला अनेक आजार जडत आहेत. त्यामुळे फळाचा राजा आंबा हा आता गुणकारी नसून विषारी होत चाचला असल्याचे बोलले जात आहे. उन्हाळ्यात आंब्याला प्रथम प्राधान्य दिले जाते. पाहुण्यांसाठी पाहुणचार म्हणून आंब्याचा रसाची मेजवानी दिली जाते. विविध प्रजातींच्या आंब्यांना विशेष मागणी असते; पण आंबा पिकविण्यासाठी स्थानिक द्रव्याचा किंवा कारपेटचा वापर करण्यात येतो. सदर पदार्थ मानवी आरोग्यासाठी अपायकारक असून त्याकडे जिल्ह्यातील अन्न व औषधी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अन्न व औषधी प्रशासनाच्या या मवाळ धोरणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहेत. यंदाच्या वर्षी गावरान आंबा सहज मिळेनासाच झाला आहे. शिवाय गावरान आंब्याची जागा रत्नागीरी व आंध्र प्रदेशातील हापूस, दशहरी, लंगडी आदी आंब्याने घेतली आहे. सध्या आर्वी बाजारपेठेत आंब्याची आवकही मोठी वाढली आहे. रासायनिक द्रव्यांने न पिकविण्यात आलेल्या आंब्यांना खरेदी करताना ग्राहक प्राधान्य देत आहेत. परंतु, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची निरोगी आरोग्य हा हेतू केंद्रस्थानी ठेवून योग्य पाऊल उचलण्याची मागणी आहे.पिकूनही गावरान ‘आंबा’ आंबटचतालुक्यातील अनेक गावे पूर्वी आमराईसाठी प्रसिद्ध होती. परंतु, अनेकांनी सदर आंब्याची मोठाली झाडे विकासाच्या नावाखाली तोडल्याने यंदाच्या वर्षी गावरान आंबा सहज मिळणे दुरापास्त झाले आहे. ऐरवी उन्हाळ्याच्या दिवसात सहज मिळणारा गावरान आंबा यदांच्यावर्षी झालेल्या अवैध वृक्ष तोडीमुळे मिळणे कठीण झाले आहे. यंदा गावरान आंबा पिकला असला तरी तो सहज मिळत नसल्याने नागरिक ‘आंबा पिकला तरी आंबटच’ असल्याचे बोलत आहे.
फळांच्या राजाला घातक रसायनांचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 11:46 PM
सर्व फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख. तसेच आंबा हा मानवी आरोग्यासाठी अतिशय गुणकारीच. त्याच्या सेवनाचे अनेक फायदे असल्याचे जाणकार सांगतात. परंतु, आंबा पिकविण्यासाठी सध्या घातक रसायनाचा वापर केल्या जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
ठळक मुद्देआरोग्य धोक्यात : अन्न व औषधी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे