दोन वर्षांनंतर झाली कारवाई : तीन जेसीबीच्या साह्याने मोकळी केली रस्त्याची जागा तळेगाव (टालाटुले) : श्री क्षेत्र भोजाजी महाराज देवस्थान आजनसरा येथे जाणाऱ्या रस्त्याच्या रूंदीकरणाची योजना आखण्यात आली होती. यासाठी दोन वर्षांपूर्वी तळेगाव येथील अतिक्रमण हटविण्यात आले; पण त्यानंतर कारवाई झाली नव्हती. नोटीस, दवंडीचा सोपस्कार झाला; पण अधिकारी आलेच नव्हते. गुरूवारी अखेर बांधकाम विभागाचे अधिकारी जेसीबीसह गावात दाखल झाले. तीन जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर आलेले अतिक्रमण सकाळी ११.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत हटविण्यात आले. नागरिकांनी मुख्य रस्त्यावर वर्धा ते हिंगणघाट तथा वायगाव ते अल्लीपूर ते आजनसरा या मुख्य रस्त्यावरच अतिक्रमण केले होते. रस्त्यालगत इमारती बांधली व दुकाने थाटली होती. परिणामी, वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. दोन वर्षांपूर्वी रस्ता रूंदीकरणासाठी जमिनीचे मोजमाप करण्यात आले. त्यावेळी अतिक्रमण धारकांना नोटीस देण्यात आल्या होत्या. शिवाय मार्किंगही करून ठेवण्यात आले होते. काही ठिकाणी रस्त्याचे काम सुरू झाल्याने अतिक्रमण हटविण्यात आले; पण ते अर्धवटच राहिले होते. यामुळे पुन्हा अतिक्रमण वाढले. यानंतर जानेवारी महिन्यात अतिक्रमण धारकांना नोटीस बजावल्या. शिवाय दवंडीही दिली होती. यामुळे काहींनी अतिक्रमण काढून दुसऱ्याकडे भाडेतत्वावर घर घेतले; पण पथक गावात दाखल झालेच नाही. अखेर गुरूवारी सकाळी ११.३० वाजता अतिक्रमण हटविण्यासाठी पथक दाखल झाले. तीन जेसीबीच्या साह्याने अतिक्रमण हटविण्यात आले. साहित्य उचलून नेण्याकरिता तीन ट्रक वापरले गेले. महागाईच्या काळात घर व दुकान पडल्याने ग्रामस्थांचे डोळे पानावल्याचे दिसून आले.(वार्ताहर) राजकारणामुळे कारवाईला झाला विलंब दोन वर्षांपूर्वी बांधकाम विभागाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी अर्धवट राहिलेली कारवाई राजकारण आडवे आल्याने रखडली होती, अखेर गुरूवारी प्रशासनाकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली. तळेगाव ते आजनसरा मार्गाचे रूंदीकरण गरजेचे होते. तळेगाव येथे अतिक्रमणामुळे वाहतुकीचा खोळंबा होत होता. यामुळे ही कारवाई योग्यच असल्याचे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले. मुख्य मार्गावरच नागरिकांनी अतिक्रमण केल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करवा लागत होता. आता अतिक्रमण हटल्याने रस्ता रूंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्ता रूंदीकरणासाठी अतिक्रमण हटविणे गरजेचे होते. जागा मिळेल तेथे अतिक्रमण करण्यात आल्याने ही कारवाई योग्यच आहे, असे मत काही ग्रामस्थांनी व्यक्त केले. आपलेही अतिक्रमण हटणार, हे माहिती असल्याने दोन वर्षांपासून नागरिक प्रतीक्षा करीत होते; पण अतिक्रमण काढण्याऐवजी काहींनी दुकाने थाटली तर काहींनी घरे बांधली. असे असले तरी सर्वांत धास्ती होती.
‘त्या’ अतिक्रमणावर चालला गजराज
By admin | Published: March 17, 2017 2:04 AM