लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना पंचायत राज अमलात आणले गेले, पण त्याची योग्य अंमलबजावणी झाली नाही. परिवर्तन फक्त महात्माच करू शकतात असे नसून अहिंसेच्या माध्यमातून फार मोठे क्रांतिकारक बदल, परिवर्तन मोहनदास यांनी केले आहे. आज व्हॉटस्ॲप, विद्यापीठाच्या माध्यमातून काय ज्ञान मिळणार? अहिंसेचा अर्थ खऱ्या अर्थाने गांधीजींनी दिला. त्यांनी जीवनात अहिंसा अंगीकारली. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचणे आवश्यक आहे. गांधी आर्थिक, सामाजिक व मानवीय मूल्यांना जोडण्याचे काम करतात, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. राजन वेळुकर यांनी केले.सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या यात्री निवास सभागृहात दोन दिवसीय गांधी आणि ग्रामस्वराज्य या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ते परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर सेवाग्राम आश्रमचे अध्यक्ष टी. आर. एन. प्रभू, सामाजिक विज्ञान संस्थेचे अध्यक्ष डॉ. जार्ज मॅथ्यू, जमनालाल बजाज मेमोरियल लायब्ररी आणि रिसर्च सेंटर सेवाग्रामचे संचालक डॉ. सी. बी. के. जोसेब यांची उपस्थिती होती.प्रा. वेळुकर पुढे म्हणाले, गांधी देशासाठी क्रांतिकारक ठरले. त्यांचे महत्त्व आज, काल आणि उद्याही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. भाषण ऐकण्यापेक्षा त्याचे सकारात्मक परिणाम आणि रुजणे आवश्यक असते. गांधीजींनी अहिंसेचा उपयोग केला. गांधी समजण्यासाठी अहंकार सोडावाच लागतो. आज आपण जीडीपीबाबत खूप काही ऐकतो, पण यात मानवी मूल्याचे काय? असा प्रश्न याप्रसंगी वेळुकर यांनी उपस्थित केला. सध्याच्या विज्ञान युगात गांधीजींच्या आर्थिक, सामाजिक विकास मूल्यांना समजणे गरजेचे आहे. सामाजिक परिवर्तन घडविणारे अर्थशास्त्र शिकवले पाहिजे. आज भविष्याच्या समस्येविषयी नवीन पिढी विचारत आहे. त्याचे उत्तर देता आले पाहिजे. नयी तालीम शिक्षण प्रणाली समजावून घेतली पाहिजे. शेवटी जे करणार आहे ते मानवासाठी, त्यामुळे गांधीजींच्या अर्थशास्त्राला समजावून घेतले पाहिजे, असे प्रा. वेळुकर यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी गांधी फाऊंडेशन, हाऊस ऑफ लॉर्डस युनायटेड किंग्डमचे सदस्य लॉर्ड भिकू पारेख यांचा संदेश भाषणाचा व्हिडिओ दाखविण्यात आला, तसेच राष्ट्रीय गांधी संग्रहालय दिल्लीच्या माजी संचालिका वर्षा दास यांनीही आपले विचार व्हिडिओच्या माध्यमातून मांडले. प्रास्ताविक डॉ. जार्ज मॅथ्यू यांनी केले. संचालन प्रियंका यादव यांनी केले, तर उपस्थितांचे आभार डॉ. सी. बी. के. जोसेफ यांनी मानले.
‘गांधी आश्रम’ सामान्य जीवन जगण्याचे उत्तम उदाहरण - प्रभू- गांधीजींच्या दृष्टीने प्रगती विकासाचे स्थान व्यक्ती असावा. सामान्य जीवन आपण जगू शकतो याचे जिवंत उदाहरण गांधीजींचे आश्रम होय. स्वातंत्र्यलढ्याची राजधानी सेवाग्राम राहिले. नयी तालीम शिक्षण प्रणाली आदर्श असून ग्रामस्वराज्य ही कल्पना पंचायत राजच्या माध्यमातून समाजातील तळागाळापर्यंत पोहोचली नाही. भविष्याचा विचार करता परिवर्तन हे व्यक्तीपासून होते. जे गांधीजींनी आपल्या जीवनातून आपल्यासमोर ठेवले आहे, असे याप्रसंगी टी. आर. एन. प्रभू यांनी सांगितले.