शांती पठण कार्यक्रम : आश्रमात पर्यटकांकरिता ठेवले पुस्तक लोकमत न्यूज नेटवर्क सेवाग्राम : सबंध जगाचे प्रेरणास्त्रोत असलेल्या महात्मा गांधीजींच्या ग्राम सेवा प्रयोगांची माहिती मिळावी म्हणून ‘सेवाग्राम चित्रावली’ या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. भावीपिढीकरिता वैचारिक ठेवा ठरणाऱ्या हे पुस्तक नुकतेच बापू कुटीला अर्पण करण्यात आले आहे. यानिमित्त शांती पठण करण्यात आले. गांधीजी दहा वर्षे स्थायी आणि दोन वर्षे अस्थायी, असे बारा वर्षे सेवाग्राम आश्रमात वास्तव्यास होते. आत्मसाक्षात्काराचे लक्ष्य समोर ठेवून ग्रामसेवेचे प्रयोग त्यांनी या दरम्यान राबविलेत. झोपडीला बापंूनी निवासस्थान केले. निष्ठावान सहयोगी आणि सत्याग्रहींना सोबत घेवून स्वातंत्र्यलढ्याची दिशा निश्चित केली होती. या घटनांचा क्रम चित्ररूपाने या पुस्तकातून जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अहिंसक समाजरचना निर्मिती, अकरा व्रतांचे पालन याचाही उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. आजही आश्रमात आत्मीक साधनाचे दर्शन घडते. चरखा ते स्वातंत्र्य, शिक्षण, रचनात्मक कार्याचा साक्षात्कार या पुस्तकातून वाचक आणि अभ्यासकांना झाल्याशिवाय राहत नाही. यामुळे अभ्यासकांना गांधीजी आणि त्यांच्या जीवनशैलीला प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी ‘सेवाग्राम चित्रावली’ पर्वणी ठरणार आहे. महात्मा गांधी आश्रम परिसर, त्यांची जीवनशैली तथा अन्य व्रतांची ही चित्रावलीही प्रेरणादायी अशीच आहे. तीन भागात सेवाग्राम आश्रमातील गांधी दर्शन पुस्तकाचे तीन भाग करण्यात आले असून प्रथम भागात आश्रमातील गांधीजींचे जीवन, कुट्यांची निर्मिती, येथे वास्तव्यास असलेल्या व्यक्ती. दुसऱ्या भागात नई तालीमची गाथा, परिसर कार्यकर्ता, शाळा, कार्य, शिक्षण आणि तिसऱ्या भागात आश्रम, गाव आणि परिसरात निर्माण करण्यात आलेल्या रचनात्मक कार्य करणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांची माहिती दिलेली आहे. या पुस्तकात महात्मा गांधी यांचे अत्यंत दुर्मिळ चित्र आहेत. यातील छायाचित्र व माहितीचे संकलन व संपादन गांधी सेवा संघाचे अध्यक्ष कनकमल गांधी यांनी केले आहे. गांधीजींचे विचार, कार्याची झलक या पुस्तकातून दिसून येणार आहे. त्यांचा कालखंड ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाचा असून आजही त्यांच्या विचारांची गरज जाणवते. नव्या पिढीसाठी हे पुस्तक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. - कनकमल गांधी, अध्यक्ष, गांधी सेवा संघ, सेवाग्राम.
‘सेवाग्राम चित्रावली’तून गांधी जीवनशैलीचा वेध
By admin | Published: June 08, 2017 2:33 AM