वर्धा : शहरातील एका संघटनेतर्फे अनेक वर्षांपूर्वी गांधी पार्क स्मारकाची निर्मिती करण्यात आली. परंतु ज्या संघटनेतर्फे या स्मारकाची निर्मिती करण्यात आली त्याच संघटनेला या स्मारकाचा विसर पडल्याचे दिसत आहे. शिवाय शहरातील प्रशासनाचेही अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. जयहिंद युवा जागरण समिती भारतद्वारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १२५ व्या जयंतीदिनी २ आॅक्टोबर १९९५ ला या पार्क आणि स्मारकाचे थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. पण आजघडीला या पार्कची आणि स्मारकाची दैनावस्था झाली आहे. युवा जागरण समिती भारत या संघटनेतर्फे प्रतिकात्मक बापूकुटीच्या स्मारकाची निर्मिती करण्यात आली होती. पण त्या चबुतऱ्याला आता भेगा पडल्या आहेत. अनेक वर्षांपासून या चबुतऱ्याची, संरक्षक भिंतीवरील लोखंडी ग्रीलचीही रंगरंगोटी करण्यात आलेली नसल्याचे निदर्शनास दिसून येत आहे. पार्क परिसरात अनेक झाडे वाढली आहे. प्रवेशद्वार तुटलेले आहे. चबुतऱ्यात बसविण्यात आलेला संगमरवरी दगड वृक्षामुळे झाकोळला गेला आहे. शोभिवंत झांडाचा या पार्क परिसरात तर पत्ताच नाही. संबंधित संघटनेला या परिसराचे सौंदर्यींकरण करण्यासोबतच पार्कच्या संरक्षणाच्या जबाबदारीचे विस्मरण झालेले यावरून दिसत आहे. या परिसराला सदैव जड वाहनांनी विळखा घातलेला असतो. प्रतीकात्मक बापूकुटी पूर्णत: धुळीने माखलेली आहे. चबुतऱ्याची झालेली जीर्ण अवस्था पाहता कधीही जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या पार्कपासून जवळच नगरपालिका आहे. मात्र नगरपालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. या पार्कची मागील अनेक दिवसांपासून अशी अवस्था झालेली असताना एकाही सामाजिक संघटनेचे याकडे लक्ष नाही. प्रवेशद्वार तुटलेले असल्याने मोकाट जनावारांचा येथे मुक्त संचार पाहायला मिळतो. शिवाय पार्क परिसरात दारुच्या बाटल्या दिसून येतात.(शहर प्रतिनिधी)
शहरातील गांधी पार्क स्मारकाची दुरवस्था
By admin | Published: June 30, 2014 12:04 AM