सेवाग्राम (वर्धा) : गांधी, विनोबा, जयप्रकाश यांच्या विचारांचे पाईक असलेले सर्वोदयी आणि विविध संस्थांच्या माध्यमातून भारतभर सतत कार्यरत असणारे सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष जयवंत गंगाराम मठकर यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले. ते गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होते. सोमवारी पुण्यात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात मंगळवारला सकाळी अंतसंस्कार पार पडला.
गांधी, विनोबा आणि जयप्रकाश यांची विचारसरणी आणि सर्वोदयाचा विचार घेऊन आयुष्यभर त्यांनी काम केले. साने गुरूजी, कथामाला, राष्ट्रसेवा दल, सर्व सेवा संघ, सर्वोदय मंडळ, खादी ग्रामोद्योग मध्यवर्ती संघ, महात्मा गांधी लोकसेवा संघ, महाराष्ट्र सेवा संघ, महाराष्ट्र ग्रामदान मंडळाचे अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान इ.संस्थेत त्यांनी विविध पदांवर कार्य केले.
जयवंत मठकरांचा जीवनप्रवास
जयवंत मठकर हे मुळचे रत्नागिरी जिल्ह्यातील मठ या गावचे. त्यांचा जीवनप्रवास हा खडतर असाच राहिला आहे. मठकर यांचा परिचय सर्वोदय जगतात "काका"म्हणूनच सदैव राहिला आहे. त्यांचे विचार व कार्याची छाप याचा प्रत्यक्ष अनुभव सेवाग्रामसह वर्धा येथील अनेक संस्थानी, लोकांनी अनुभवला आहे. माणसे जोडणे, युवकांना सक्रिय करणे, जबाबदारी देणे यामधून ते सर्वांमध्ये लोकप्रिय बनले होते.
त्यांचा पाच वर्षांचा काळ हा आश्रम वासियांसाठी तसेच सेवाग्राम वासियांसाठी अत्यंत महत्त्वाचा व स्मरणीय असाच राहिला आहे. त्यांनी कापूस ते कापड हा उपक्रम सुरू केला. यातून आश्रमातच खादीला चालना दिली. पर्यटकही सूतकताई व विनाई पाहून गांधीजींच्या काळातील खादीचे काम प्रत्यक्ष पाहता येऊ लागले. सेवाग्राम येथील दारूबंदी महिलांना सक्रिय करणे, सर्वोपरी मदत करीत असल्याने दारूविक्रेत्यांवर नियंत्रण आले होते.
सर्वोदय समाज संमेलन घेण्यात त्यांचा विशेष पुढाकार होता. गांधीजींचे नातू प्रा.जगमोहन गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अॅड. प्रकाश आंबेडकर यांना एकाच विचार पिठावर आश्रमात आणून गांधी-आंबेडकर वाद हा कधीच नव्हता तर ती वैचारिक लढाई होती हे त्यांनी दाखवून दिले.
सेवाग्राम आश्रमातील कार्यकर्त्यांशी त्यांचा संबंध प्रेमवत आणि पारिवारिक असाच राहिला आहे. कार्यकर्त्यांना नेहमीच ते मान सन्मान देत, आस्थेने चौकशी करीत असे. त्यांच्या निधनाने एक सक्रिय कार्यकर्ता गमावला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, जावई, एक मुलगा, सून, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.