लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम आश्रमातील वास्तव्याला ७५ वर्षे झाले. या पार्श्वभूमीवर पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा आता सेवाग्राम, पवनार व वर्धा असा विस्तार करण्यात आला आहे. या परिसरात करण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत गांधीवादी विचारवंत व दोन्ही आश्रमातील कार्यकर्त्यांची सहमती घेण्यात येत आहे.मंगळवारी पवनार आश्रमातील वास्तव्याला असलेल्या गांधीवादी नेत्यांना या आराखड्यातून करण्यात येणाºया विविध विकास कामांबाबत माहिती देण्यात आली. पवनार आश्रम परिसरात कुठे व कोणती कामे करण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच या आराखड्यातील कामांत काही बदल हवे असतील तर आपण सुचवावे, अशी विनंतीही गांधीवादी मंडळींना करण्यात आली असल्याचे पवनारचे सरपंच अजय गांडोळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सेवाग्राम परिसरातही विविध विकास कामे करण्यात येत आहेत. या कामांच्या संदर्भातही आश्रम ट्रस्टच्या गांधीवाद्यांशी तसेच इतर ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्यांना याबाबत माहिती दिली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. १४४ कोटी ९९ लाख ७५ हजार रुपये निधी या कामासाठी दिला जाणार आहे. स्वत: विभागीय आयुक्त या विकास कामांबाबत देखरेख करीत असून जिल्हाधिकारी व साबावि या कामांना मुर्तरूप देत आहे.
सेवाग्राम-पवनार विकास आराखड्यात गांधीवाद्यांचीही सहमती घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:07 PM