अभिनय खोपडेसे
वाग्राम( वर्धा) : अमरावती विश्वविद्यालयाच्या दीक्षांत समारोहात आलो होतो. पूज्य बापूंच्या आश्रमात जायचे नाही असे होऊ शकत नाही. पूज्य बापूजींचा साधेपणा आणि स्वाभाविकता जीवन याविषयी पुस्तकात वाचले होते; पण आज या ठिकाणी येऊन मी वास्तविकता पाहिली आहे. गांधीजींचे देशाप्रती योगदान विसरू शकत नाही, असा अभिप्राय राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी सेवाग्राम आश्रमात भेटीदरम्यान नोंदवहीत नोंदविला.
आश्रमात त्यांचे स्वागत सेवाग्रामच्या सरपंच सुजाता ताकसांडे ,ग्रामविकास अधिकारी कैलास बर्धिया यांनी चरखा व सूतमाळेने तसेच सेवाग्राम आश्रमाच्या वतीने सिद्धेश्वर उंबरकर यांनी ‘गांधी जी की आत्मकथा’ हे पुस्तक देऊन केले.मार्गदर्शिका अश्विनी बघेल यांनी आदी निवास, बा व बापू कुटी, बापू दप्तर, आखरी निवास आदी स्मारकांची माहिती दिली. यात आश्रमात बापूंनी लावलेलं पिंपळवृक्ष, आचार्य विनोबा भावे यांच्या ही पिंपळवृक्षाचा उल्लेख केला आणि प्रार्थना भूमी यांचीही माहिती देण्यात आली. याप्रसंगी खासदार रामदास तडस, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरूल हसन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रोहन घुगे, अपर जिल्हाधिकारी महेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी दीपक करंडे, तहसीलदार रमेश कोळपे, प्रभारी कार्यकारी अभियंता महेश माथुरकर, राजेंद्र आचार्य, सेवाग्राम विकास आराखड्याचे अभय शिंगाडे, अजय धर्माधिकारी, कुमार बारसागळे, गुलशन पटले, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राज्यपाल बैस यांनी बापूंच्या आश्रमात येणार नाही असे होऊ शकत नाही. गांधीजी मातीच्या घरात राहिले. त्यांचे साधे जीवन आपल्या समोर एक आदर्श प्रस्तुत करते. वास्तविक त्यांना साऱ्या सुविधा मिळू शकत होत्या; पण त्यांनी सर्व सुविधांचा त्याग करून आपले जीवन जनसेवेला लावले. कोढसारख्या रुग्णाची सेवा केली. आपण कुणाला महान मानतो याचा अर्थ त्यात महानता आहे. माझ्या मनात जिज्ञासा होती की राज्यपाल झाल्यावर या ठिकाणी यायची ती आज पूर्ण झाली आहे. कठीण परिस्थितीत देशाला जोडण्याचे काम त्यांनी केले. त्यांना राष्ट्रपिता संबोधिले. या धरतीची माती माझ्या कपाळी लाऊन बापूंना अभिवादन करतो, असे राज्यपाल यावेळी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना म्हणाले.
राज्यपाल यांनी जवळपास अर्धातास आश्रमात घालविला. उपस्थितासोबत त्यांनी फोटो काढले. त्यांनी आईये आप भी हमारे साथ फोटो खिचवाईये, असे म्हणताच अनेकांनी समूहाने फोटो काढले. आश्रमात आगमन होताच त्यांनी बूट आपल्या वाहनात काढून ठेवले; पण जाताना मात्र ते वाहनाजवळ आपली चप्पल विसरले. बूट घालणे काढण्यासाठी त्यांना मदत करण्यात आली. आश्रमात ते स्लिपर घालूनच फिरले. सुरक्षा रक्षकांच्या वेढ्यात असले तरी तणाव मात्र दिसला नाही. मोकळेपणाने त्यांचा आश्रमातील वावर राहिला. याप्रसंगी राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे यांनी राज्यपाल यांची भेट घेऊन निवेदन दिले.