Ganesh Chaturthi 2018; आर्वी शहरात २७५ वर्षांपूर्वी निघाली जमिनीतून गणपतीची मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:23 AM2018-09-13T11:23:35+5:302018-09-13T11:23:56+5:30
शहरातील गणपती वॉर्ड येथील स्व. शेठ बिसनदास राठी यांनी आपल्या घरासमोरील खाली जागेत २७५ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. काही अंतरावरच गणपतीची हुबेहुब मूर्ती निघाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शहरातील गणपती वॉर्ड येथील स्व. शेठ बिसनदास राठी यांनी आपल्या घरासमोरील खाली जागेत २७५ वर्षांपूर्वी विहिरीचे खोदकाम सुरू केले होते. काही अंतरावरच गणपतीची हुबेहुब मूर्ती निघाली. यामुळे विहिरीचे बांधकाम बंद करून तेथे मंदिराचे बांधकाम करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.
तेव्हापासून आजपर्यंत तेथे दररोज सकाळ सायंकाळ, पूजा अर्चा केली जात आहे. अत्यंत जुने असलेले गणपती मंदिर आर्वी शहर व परिसरात प्रसिद्ध आहे. मंदिराचे द्वार भाविकांना दर्शन घेता यावे म्हणून सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ६ ते ९ या वेळेत उघडले जाते. याच वेळेत सर्व भाविक दर्शन घेऊन पूजा अर्चा करतात. या मंदिराची स्थापना सन १७७५ ते १८०० दरम्यान जवळपास ३०० वर्षांपूर्वी स्व. बिसनदास राठी यांच्याहस्ते करण्यात आली होती. दरवर्षी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. यासाठी गणपती मंदिरासमोर तथा मंदिराला दिव्यांची आरास केली जाते. वर्षांतून दोन वेळा विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या दरम्यान ५६ भोग कार्यक्रम घेऊन संपूर्ण आर्वी शहरातील भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
बिसनदास राठी याच्यानंतर त्यांचे पुत्र गोपालदास राठी, त्यानंतर त्यांचे पुत्र विठ्ठलदास राठी आणि सध्यास्थितीत सुधीर आणि अशोक राठी या जागेचे मालक म्हणून देखरेख करीत आहे. या मंदिरात १७५० रोजी प्रथम पुजारी म्हणून किसन पंडीत रावत, त्यानंतर भानू महाराज उर्फ फुलचंद सटोळ, त्यानंतर सत्यनारायण पुरोहित तर सध्या सागर पुरोहित हे पुजारी म्हणून काम पाहत आहेत.