Ganesh Chaturthi 2018; वर्धा जिल्ह्यात सेलूमध्ये लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती गणेश स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:04 AM2018-09-13T11:04:36+5:302018-09-13T11:06:03+5:30
इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुलींग चेतविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमातेला स्वतंत्र करण्यासाठी प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुलींग चेतविण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला सुरूवात केली. त्या काळी खुद्द लोकमान्य टिळकांच्या हस्ते सेलूत बारभई गणेश मंडळाची स्थापना झाली. गेल्या ११८ वर्षात ही परंपरा अविरतपणे सुरू आहे. सेलूच्या बारभाई गणेशमंडळाने यंदा ११९ व्या वर्षात पदार्पण केले आहे.
समर्थ स्वामी रामदास यांनी आध्यात्मिकता टिकवून ठेवण्यासाठी गावागावात हनुमान मंदिर व आखाड्यांची श्रृंखला निर्माण केली होती. त्याच धर्तीवर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश उत्सवाला प्रारंभ केला. सन १८९९ मध्ये लोकमान्य टिळक सेलू येथे आले होते. त्यांनी समाजातील काही लोकांना एकत्र करून स्वातंत्र्य लढा अधिक प्रखर करण्यासाठी प्रत्येकांच्या मनात स्वातंत्र्याचे अग्निकुंड प्रज्वलीत केले. या सभेला त्यावेळी बारा जण एकत्र आले म्हणून बारभाई गणेश मंडळ असे मंडळाचे नामकरणही टिळकांनी केले.
मंडळाच्या पहिल्या सभेला लोकमान्य टिळकांसह गणपतराव जोशी, आबाजी वºहाडपांडे, रामदेव जाजोदीया, नथमल राठी, बेदरकरबुवा, रामविलास सराफ, श्रीचंद्र बेदमोहता, दीपचंद चौधरी, गजानन उपाध्ये, हिरालाल राठी आदी मंडळी उपस्थित होती. मारवाडी मोहल्यात सुरू झालेला हा उत्सव आजही उत्साहाने व विधिवत धार्मिक पद्धतीने पार पडतो.
याकाळात केळझर येथे जंगल सत्याग्रह झाला होता. काहींना अटकही झाली होती. टिळकांच्या आदेशाला सर्वस्व मानणाऱ्या तेव्हाच्या देशप्रेमी विचारांच्या मंडळींनी तन, मन, धन याची बाजी लावीत स्वातंत्र्यप्राप्तीच्या अग्निकुंडात आपल्या सर्वस्वाच्या समिधा टाकण्यासाठी मागेपुढे पाहिले नाही. टिळकांच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या लढ्याला बळ दिले. पाचव्या पिढीच्या हाती या मंडळाची सुत्रे ज्येष्ठांनी दिली. ही नवी पिढी तेवढ्याच श्रद्धेने अखंडीतपणे ११९ व्या वर्षांच्या बाप्पाच्या आगमनाची तयारी करीत आहे. यंदाही विधीवत गणरायाची प्रतिष्ठापना करुन दहा दिवस विविध धार्मिक , सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करुन गावात भक्तीमय वातावरण निर्माण केले जाते.
श्रींची मूर्ती देण्यासाठी भक्तांची स्पर्धा
बारभाई गणेश मंडळाशी जुळलेल्या प्रत्येक भाविकाला दरवर्षी आपल्याकडून मूर्ती देण्याची इच्छा असते, मात्र पुढील दहा वर्षे पर्यंतची मूर्ती दरवर्षी प्रत्येक एकजण या प्रमाणे श्रद्धापूर्वक स्वखर्चाने देण्यासाठी मंडळाकडे नावाची नोंदणी करून ठेवते. त्यामुळे इच्छा असूनही अनेकांना ‘श्री’ ची मूर्ती देता येत नाही. मूर्तीसाठी येणारा खर्च दरवर्षी प्रत्येक एक जण स्वत:कडे घेण्यासाठी जणू स्पर्धाच असते.