लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: वर्धा लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची पाहणी करीत विचारपूस केली असता त्यांनी मोबाईल चोरीची कबुली पोलिसांना दिली. त्यांच्याकडून वर्धा लोहमार्ग पोलिसांनी १ लाख ६५ हजार २४० रुपये किंमतीचे एकूण ११ मोबाईल जप्त केले असून सदर तिन्ही महिला आंध्रप्रदेशातील विजयवाडा येथील रहिवासी आहेत, हे विशेष.धावत्या रेल्वे गाडीतून मोबाईल पळविल्या जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी वर्धा लोहमार्ग पोलिसांनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वर्धा लोहमार्ग पोलिसांची एक चमू खात्रीदायक माहितीच्या आधारे बल्लारशाह रेल्वे स्थानकावर गस्तीवर होती. सदर चमूतील काहींना तीन महिलांवर संशय आल्याने त्यांनी दुर्गा संतोष दावरकोंडा (५५), मरीअम्मा जकरय्या पटेल (५०) व सोनी बुशीदोरा पटेल (३०) रा. विजयवाडा आंध्रप्रदेश यांना ताब्यात घेवून त्यांच्या जवळील साहित्याची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात मोबाईल असल्याचे निदर्शनास आले. अधिक विचारपूस दरम्यान सदर तिनही महिलांनी मोबाईल चोरीच्या गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली. या महिला धावत्या रेल्वे गाडीतून व गर्दीच्या ठिकाणाहून मोबाईल लंपास करीत असल्याचे वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख ६५ हजार २४० रुपयांचे एकूण ११ मोबाईल जप्त केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई नागपूर लोहमार्गचे पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या मार्गदर्शनात वर्धा लोहमार्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन वडते यांच्या निदेर्शानुसार संतोष दाबेराव, जगदीश घनोरकार, अशोक हनवते, नितीन शेंडे, नितीन लोटवार, गिरीष राऊत, दिलीप बारंगे आदींनी केली.
बल्लारशाह रेल्वेस्थानकावर आंध्रातील महिला मोबाईल चोरांची टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 3:45 PM
वर्धा लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून संशयास्पद हालचाली करणाऱ्या तीन महिलांना ताब्यात घेतले.
ठळक मुद्देअकरा भ्रमणध्वनी जप्त