लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : गोरगरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. ते राज्य सरकार पूर्ण करीत आहे. यासाठी जिल्ह्यातील गरीब, दुर्बल व शोषित एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून प्रत्येक तालुक्यात दोन निवासी शाळा उभारण्यात येत आहे, असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले.हैबतपूर येथे मागासवर्गीय निवासी शाळेचा त्यांच्या हस्ते रविवारी शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला नागपूर विभागाचे समाज कल्याण उपायुक्त माधव झोड, जात पडताळणी समितीचे उपायुक्त सुरेंद्र पवार, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी अविनाश रामटेके, जात पडताळणी समिती संशोधन अधिकारी गौतम वाकोडे उपस्थित होते.बडोले पूढे म्हणाले की, मागासवर्गीयांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. पुढील दोन वर्षांत रमाई योजनेंतर्गत अल्प उत्पन्न असणाºया प्रत्येक नागरिकांना हक्काचे घर बांधून दिले जाईल. दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत केवळ रस्ते नव्हे तर पाणी व स्वच्छता यावर भर दिला जाणार आहे. शिष्यवृत्ती मिळाली नाही वा प्रलंबित असल्यास ती त्वरित देण्याच्या तथा डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती-निमित्त मंजूर वसतिगृहे त्वरित पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.प्रास्ताविकातून झोड यांनी वर्धा तालुक्यात उमरी (मेघे) व आर्वीत हैबतपूर येथे वसतिगृहे बांधली. १०.९५ कोटी रुपये खर्चाच्या निवासी शाळेत इयत्ता ५ ते ८ पर्यंत २०० विद्यार्थ्यांची निवास व शिक्षणाची सुविधा आहे. ८० टक्के अनु. जाती तर इतर प्रवर्गास १० टक्के जागा राखीव राहील, असे सांगितले. मुख्याध्यापक नळे, गृहपाल अजमिरे व विद्यार्थी उपस्थित होते.
गरीब व शोषित विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 11:49 PM
गोरगरीब जनतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे, हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते.
ठळक मुद्देराजकुमार बडोले हैबतपूर येथे मागासवर्गीय निवासी शाळेस प्रारंभ