कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा : दीड-दोन महिन्यांपासून वाहने उभीचलोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : नगर पालिका प्रशासनाने काही वर्षांपूर्वी कचरा व्यवस्थापन कार्यक्रम राबविला होता. यात कचरा संकलनासाठी वाहने खरेदी केली. काही वर्षे ही वाहने शहरातील वॉर्डात फिरून कचरा गोळा करीत होती; पण मागील काही महिन्यांत ती पालिकेची शोभा वाढवित आहेत. शहरात पाच वाहने असून चार वाहने पालिकेतच उभी आहेत. परिणामी, शहरात कचरा व्यवस्थापनाचा बोजवाराच उडाल्याचे चित्र आहे.शहरात कचऱ्याचे ढिगारे दिसू नये, नागरिकांना कचरा टाकण्यासाठी अन्यत्र जावे लागू नये म्हणून घंटागाड्या खरेदी केल्या होत्या. सध्या पालिका प्रशासनाकडे पाच गाड्या आहेत; पण त्या कचरा संकलित करीत नाही. पाचपैकी चार वाहने पालिका कार्यालयाच्या आवारात उभ्या आहेत. तत्पूर्वी, तीन चाकी बंड्यांच्या माध्यमातून शहरातील कचरा संकलित होत होता; पण त्या अस्थायी कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले. यामुळे त्या तीन चाकी कचरा संकलित करणाऱ्या गाड्या भंगारात गेल्या आहेत. यानंतर चार चाकी घंटागाड्या घेण्यात आल्या. काही दिवस या गाड्यांच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक वॉर्डातून कचरा गोळा करण्याचे काम करण्यात आले. यात ओला व सुका कचरा वेगळा गोळा केला जात होता. तो कचरा शहराबाहेर वर्धा रोडवरील ‘डम्पिंग ग्राऊंड’वर टाकला जात होता. या ठिकाणी कचऱ्यापासून खत निर्मिती प्रक्रियेसाठी तत्कालीन मुख्याधिकारी डॉ. मेघना वासनकर यांनी निवीदाही काढली होती; पण हा कार्यक्रम कागदावरच राहिला आहे. सध्या चारही गाड्या पालिकेच्या आवारात उभ्या आहेत. दीड ते दोन महिन्यांनी कधीतरी त्या शहरात फिरून कचरा गोळा करतात. यामुळे कचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा झाले असून लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
कचरा संकलनाच्या घंटागाड्या शोभेच्या
By admin | Published: July 17, 2017 2:11 AM