हिंगणघाट (वर्धा) : तालुक्यातील सावली वाघ येथे सिलिंडरचा भडका उडून आग लागल्याने ५ झोपड्या जळून बेचिराख झाल्या. हिंगणघाट अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या घटनेत अंदाजे ५ लाखांचे नुकसान झाल्याच्या अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आज (दि. २७) सकाळी सव्वा दहाच्या सुमारास सावली वाघ येथील झोपडपट्टीतील तुकाराम नांदे यांच्या झोपडीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागली. काही वेळातच आगीने मोठे रुप धारण केले व लगतच्या ४ झोपड्यांना कवेत घेतले. दरम्यान, माहिती मिळताच हिंगणघाटच्या अग्निशमन दलाच्या चमू घटनास्थळ गाठले व आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आग आटोक्यात आणली.
या आगीत तुकाराम नांदे, माँझिपुडा समर, ऋषी मगरे, मधुकर बोडखे, आशाबाई दोडके यांच्या झोपड्या जळून राख झाल्या. यात घरातील अन्न धान्यासह जीवनावश्यक साहित्य जळाल्याने पाचही कुटुंब उघड्यावर आले आहेत. या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार समसेरखान पठाण, मंडळ अधिकारी प्रशांत निनावे, तलाठी प्रसाद पाचखेडे, पोलीस पाटील विशाल ढेंगळे, कोतवाल प्रकाश निमसरकर, ग्रामसेवक पोहणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ठाकुर घटनास्थळी पोहचून परिस्थिती हाताळली.