लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या दरवाढीचा सर्वाधिक फटका महिलांना सहन करावा लागत असून त्याकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांचा निषेध नोंदविण्यासाठी महिला काँग्रेसच्या नेतृत्त्वात शनिवारी शहरातील महादेवपुरा भागातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या अधिकृत गॅस सिलिंडर विक्रेत्याच्या कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक करण्यात आला.पेट्रोल, डिझेल तसेच घरगुती गॅस सिलिंडरचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. या तिन्ही अत्यावश्यक वस्तूंवरील दरवाढ तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय केंद्र सरकारच्या दुर्लक्षित धोरणांच्या निषेधार्थ जोरदार नारेबाजी करण्यात आली. आंदोलनादरम्यान आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. आंदोलनाचे नेतृत्व महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा हेमलता मेघे यांनी केले. आंदाेलनात सोनाली कोपुलवार, शोभा सातपुते, अनिशा मान, प्रतिभा जाधव, वैशाली मेढेंवार, कोल्हे, वृषाली काटे, संगीता ढवळे, अरुणा धोटे, शीला ढोबळे, आशा गुजर, वैशाली मेघे, सरोज सालबर्डे, अर्चना कश्यप, सपना परियाल, आशा भुजाडे, शीला गुजर, तब्बसूम आजमी, निमा फुलबांधे आदी सहभागी झाले होते.