ग्रंथालयाचा उपक्रम : रामायणातील दृश्यांनी जिंकली वर्धेकरांची मनेवर्धा : शहराचे साहित्यिक, सांस्कृतिक आणि कलात्मक भूषण म्हणजे स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक जिल्हा ग्रंथालय होत. या ‘अ’ श्रेणीच्या ग्रंथालयातर्फे सभागृहात ‘नृत्यात्मक भावाविष्कार व गीत रामायण’ गायनाचा बहारदार कार्यक्रम स्थानिक कलाकरांनी सादर केला. या बहारदार कार्यक्रमाने उपस्थित रसिकांना रिझविले.प्रारंभी गं्रथालयाचे अध्यक्ष प्रदीप बजाज व त्यांच्या पत्नीच्या हस्ते श्रीराम पूजन करण्यात आले. यानंतर साक्षी खडसे हिने शांताकारम भुजगशयनम... हे ईशस्तवन आपल्या नृत्यातून साकारले. आंचल सोमणकर हिने श्री देवी मातेची तर सौम्या ढोले हिने श्रीरामाची स्तुती आपल्या आकर्षक नृत्यातून साकारली.याप्रसंगी स्थानिक संगीततज्ञ प्रा. विकास काळे व संच यांनी रसाळ गीत रामायणातील निवडक गीतांचा मधूर कार्यक्रम सादर केला. त्याचे अनुरूप संहिता लेखन प्रा. सरोज देशमुख यांनी लिहिले तर निवेदन प्राचार्य डॉ. माधुरी काळे यांनी केले. प्रशांत दुधाने, कवी नेसन, डॉ. भैरवी काळे, प्रा. विकास काळे यांनी गीत गायन केले. वाद्यवृंदाची अनुरूप संगत नरेंद्र माहुलकर हार्मोनियम, अविनाश काळे सिंथेसायझर, श्याम सरोदे तबला, राजेंद्र झाडे आॅक्टोपॅड व विठ्ठल दुर्गे तालबाघे यांनी केली. या भावमधूर गीत गायनास समूह गायनाची सुयोग्य साथ विजयश्री पिंपळे, मीनल सुखे, आरती कांबळे, मायकेल रक्षित व अंकुश उभाड यांनी दिली. शेवटच्या चरणात सभागृहात बालकलाकारांनी श्रीराम, सीता, लक्ष्मण व वीर हनुमान यांच्या पोषाखात तथा समस्त अलंकार परिधान करून जयजयकार, वाद्यांच्या व शंखाच्या जयघोषात प्रवेश केला. रंगीबेरंगी फुलांच्या वर्षावात ही भाव भक्तीमय विजय यात्रा रंगमंचावर अवतरली. यावेळी भरत यांनी श्रीरामाच्या चरणाचे पाद्यपूजन केले. सिंहासनावरील पादुका श्रीरामाच्या चरणी घातल्या. त्यांना सिंहासनावर बसविले. सीतामाई त्यांच्याजवळ बसली, भरत, शत्रृघ्न बाजूला उभे राहिले. हनुमानजी पायाजवळ बसून नमस्कार करते झाले. श्रीराम पंचायनाच्या या नेत्रदीपक दर्शनाने समस्त भाविक रसिक यांची अंत:करणे भारावून गेली होती. यावेळी सर्वांनी जयघोष केला. याप्रसंगी प्रा. जयंत मादुस्कर यांनी गायिलेल्या ‘त्रिवार जयजयकार’ या समूह गीताने व त्यावर पार पडलेल्या आनंद नृत्याने सर्व सभागृह भक्तीरसात न्हाऊन निघाले होते. या बहारदार कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाला गौरीशंकर टिबडेवाल, ग्रंथपाल शीतल देशपांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
गीत रामायण व नृत्याविष्काराने रसिकांना रिझविले
By admin | Published: April 11, 2017 1:17 AM