काँंगे्रसमधील बंडाळी : अपक्ष उमेदवार म्हणून केले नामांकन दाखल आष्टी (शहीद) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होताच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्यालाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाच्या वरिष्ठांकडे तगादा लावला; पण यात यश न आल्याने संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. यात किती जण माघार घेणार, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भारसवाडा पंचायत समिती गणासाठी भाजपचे माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजय लोखंडे यांनी उमेदवारी मागितली होती. सोबतच भाजपा युवा मोर्चाचे चिटणीस तथा कंत्राटदार चंद्रशेखर बाबरे यांनीही उमेदवारी मागितली होती. पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही उमेदवारी नाकारत अनंत खोरगडे यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या लोखंडे आणि बाबरे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचे ठरविले आणि नामांकन अर्जही दाखल केला. काँग्रेसकडून राजेंद्र चौधरी यांना उमेदवारी मिळाल्याने नाराज कार्यकर्ते भीमराव धावट, सुनील साबळे आणि राजेंद्र चौधरी यांचा सख्खा भाऊ प्रवीण चौधरी यांनीही अपक्ष नामांकन दाखल केला आहे. यातील कोण-कोण उमेदवारी अर्ज मागे घेतात, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. भाजप, काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांनी सर्वच ठिकाणी उमेदवार रिंगणात उतरविले आहेत तर बसपानेही ठराविक ठिकाणी उमेदवार उभे केलेत. अपक्षांच्या भाऊगर्दीने उमेदवारांचा आकडा फुगला असून किती जण रिंगणात कायम राहतील, याचा अंदाज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी येईल. सध्या तरी अपक्षांना समजावून सांगत अधिकृत उमेदवाराला निवडून आणण्याचे प्रयत्न भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून केले जात असल्याचे दिसते. भारसवाडा पंचायत समिती गणासाठी काँग्रेसने राजेंद्र चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली; पण त्यांचे सख्खे भाऊ प्रवीण चौधरी यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी भावाच्या विरोधातच अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. उमेदवारी अर्जही दाखल केला. यामुळे दोन भावातील सामना रंगल्यास अपक्ष प्रवीण बाजी मारतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.(तालुका प्रतिनिधी) लहान आर्वी जिल्हा परिषद सर्कलमध्ये बंडखोरी आष्टी (शहीद) - लहानआर्वी जिल्हा परिषद सर्कलमध्ये भाजपा व राष्ट्रवादी युतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढण्याचे ठरले होते. असे असताना भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस राजेश ठाकरे यांना भाजपाने उमेदवारी नाकारली. यामुळे त्यांनी बंडखोरी करीत राष्ट्रवादीच्या नावावर उमेदवारी अर्ज दाखल केला. आष्टी तालुक्यात राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म मिळालेले व रिंगणात असलेले ठाकरे एकमेव उमेदवार आहे. आष्टी तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राजेश ठाकरे यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचा अख्खा गट पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. यावेळी ३०० कार्यकर्त्यांच्या सभेत राजेश ठाकरे यांनी भाजपाविरोधी पाढा वाचला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते संदीप काळे यांच्यासह सर्व गावातील राष्ट्रवादीचे गटप्रमुख उपस्थित होते. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने भाजयुमोचा गट नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळेच राष्ट्रवादीकडून निवडणूक लढत असल्याचे सांगितले जात असले तरी फैसला मतदारच करणार आहेत. लहान आर्वी गटाला जोडली गावे आष्टी जिल्हा परिषद सर्कल नगरपंचायतीमुळे संपुष्टात आले. यामुळे सर्व गावे लहानआर्वी जि.प. गटाला जोडण्यात आली होती. भाजपाला अनुकूल वातावरणही निर्माण झाले होते. शिवाय राष्ट्रवादीचे नेते श्रीधर ठाकरे यांनी दोन वर्षांपासून भाजपाशी जवळीक साधल्याने राष्ट्रवादीचा गटही भाजपालाच सामील होता; पण राष्ट्रवादीचे संदीप काळे यांनी ठाकरे यांच्या मताशी सहमत न होता राष्ट्रवादीचा गट स्वतंत्र कायम ठेवत बांधणी सुरू केली आहे. या बाबीचा प्रत्यय उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी सर्व राजकीय पक्ष आणि मतदारांना आला.
सख्ख्या भावानेच केली बंडखोरी
By admin | Published: February 06, 2017 1:06 AM