सी.के. देसाई : राज्यस्तरीय कार्यशाळा व स्पर्धा वर्धा : विज्ञान ही तंत्रज्ञानाची जननी आहे. मूलभूत विज्ञानाची कास धरून विविध प्रकल्पांच्या पद्धतशीर अभ्यासाने नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती करून स्वयंप्रकाशित झाले पाहिजे, असे आवाहन आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र आॅलिंपियाडचे प्रमुख व बजाज सायन्स सेंटरचे सल्लागार प्रा. सी.के. देसाई यांनी केले. जा.ब. विज्ञान महाविद्यालयाने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळा व स्पर्धा ‘सिंटीलेशन’ च्या समारोपीय कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मंचावर अध्यक्षस्थानी शिक्षा मंडळाचे सभापती संजय भार्गव तर अतिथी म्हणून सेवानिवृत्त भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. व्ही. मोहरील, नागपूर विद्यापीठाच्या मॉलीक्युलर बॉयोलॉजी व जेनेटीकल इंजिनिअरींगच्या विभाग प्रमुख अल्का चतुर्वेदी, प्राचार्य डॉ. ओम महोदय, डॉ. पी.डी. वनकर उपस्थित होते. पुढे बोलताना प्रा. देसाई म्हणाले, मूलभूत विज्ञानाच्या उपयोगासाठी प्रकल्पाची निवड करावी. त्यातील समस्यांचे निवारण करावे. नागरिकांनी विज्ञानाला मानवतेची साथ द्यावी. आपल्याकडील वेळ व संसाधनांचा योग्य उपयोग करुन तंत्रज्ञानाच्या निर्मितीद्वारे जागतिक महासत्ता होण्याचा मार्ग सुकर होईल. चतुर्वेदी यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या वाढत्या सहभागाचे स्वागत केले. डॉ. पी.डी. वनकर यांनी स्पर्धकांद्वारे उपयोगात आणलेल्या आॅनलाईन प्रक्रिया, डीजीटलाईजेशन याचे कौतुक केले.(स्थानिक प्रतिनिधी)
मूलभूत विज्ञानाची कास धरून स्वयंप्रकाशित व्हा!
By admin | Published: March 04, 2017 12:42 AM