कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न : खर्च ४२ हजार ३५०, तर उत्पन्न १० हजार ३०० रूपये वायगाव (नि.) : शेतकऱ्यांना नापिकीने चांगलेच जेरीस आणले आहे. यापासून दिलासा मिळावा म्हणून पीक विमा योजना अंमलात आणली. मात्र या योजनेचा लाभ वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहे. वायगाव येथील शेतकऱ्याच्या असा बाबतीत घडला. विम्याची रक्कम भरुनही शेतकऱ्याला अद्याप लाभ मिळालेला नाही. तक्रार करुनही कृषी विभाकडून याची साधी चौकशी करण्यात आली नाही. वायगाव येथील एका शेतकऱ्याने त्यांच्याकडे असलेल्या ४ एकरात सोयाबीन व तुरीचा पेरा केला. याकरिता ४२ हजार ३५० रूपये खर्च आला. मात्र चार एकरात त्यांना केवळ दोन पोते सोयाबीन तर दीड पोते तुरीचे पीक झाले. केवळ १० हजार ३०० रूपयाचे उत्पन्न झाले. यातून शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, मुलांचे शिक्षण कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे. पीक विमा केल्यानंतर त्याचा लाभ मिळत नसल्याने तालुका कृषी अधिकारी, वर्धा व भारतीय स्टेट बँक यांच्याकडे वारंवार निवेदन देण्यात आले. यानंतर तालुका कृषी अधिकाऱ्याने याची साधी चौकशी केली नाही. बँकेने काढलेल्या पीक विम्याची रक्कम त्यांना देण्यात आली नाही. वायगाव (नि.) येथील भूजंग कृष्णाजी तितरे यांनी शेतीच्या मशागतीपासून तर उत्पादन घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रूपये खर्च केला. शेतातील तूर पावसाने पूर्ण जळली. त्यात पुन्हा पेरा केला. सोयाबीनची सवंगणी केल्यावर केवळ दोन पोते उत्पन्न झाले. तुरीचे अल्प उत्पन्न आले. यानंतर शेतकऱ्याने प्रस्ताव सादर केला. मात्र लाभ मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. ज्या शेतकऱ्यांनी बँकेमार्फत पीक विमा काढाला त्यांना प्रस्ताव सादर करुन पीक विम्याचा लाभ मिळालेला नाही. भूजंग तितरे यांनी संबंधित अधिकारी यांना वारंवार पत्र दिले. अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे संबंधित विभागाने अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्याने काढलेल्या विम्याचा लाभ वेळेवर मिळत नसेल तर या योजनेला काय अर्थ, अशी ओरड शेतकऱ्यांतून होत आहे.(वार्ताहर) तक्रारीकडे डोळेझाक कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जाते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने परिस्थिती यंदाही उलट झाली. शेतकऱ्यांनी काढलेला पीक विमा योजनेचा मात्र त्यांना लाभ मिळत नाही. कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. प्रस्ताव सादर केल्यावर विमा कंपनी रक्कम देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे प्रकार वाढीस लागले असून याची दखल घेण्याची मागणी आहे. शेतीसाठी कर्ज काढले होते. त्यात सोयाबीन पिकाच्या पेरणीपासून उत्पन्न घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रूपये खर्च झाला. उत्पन्न मात्र १० हजार ३०० रूपयाचे झाले. यामुळे आता कर्ज कसे फेडावे, कुटुंब कसे चालवावे, हा प्रश्न आहे. येत्या हंगामाची तयारी कशी करावी याची चिंता आहे. पीक विमा काढला, कागदपत्र सादर केले मात्र याचा फायदा झाला नाही. - भूजंग तितरे, शेतकरी, वायगाव(नि.)
पीक विमा काढला असताना लाभ मिळेना
By admin | Published: April 09, 2017 12:27 AM