घोराड : सहा हजार लोकसंख्या असलेल्या या गावाचा कारभार प्रभारी तलाठ्याकडे आहे. यामुळे हे कार्यालय सतत कुलूपबंद असते. परिणामी, विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत तलाठ्याची नेमणूक करावी, अशी मागणी ग्रामस्थांद्वारे करण्यात येत आहे. घोराड, बिबी, रिंगणी, डोरली, जखाळा आदी मौजाचा या कार्यालयात समावेश आहे. बी. बी. बडे या तलाठ्याची जिल्हा बदली झाली, तेव्हापासून आज एक वर्षाचा कालावधी होऊनही तलाठी प्रभारावरच आहे. पावडे नामक तलाठ्याकडे येथील प्रभार देण्यात आलेला आहे. हेच तलाठी जुनगड (खापरी) साझाचा कारभार पाहत आहेत. तहसील कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर घोराड हे गाव आहे. या तलाठी कार्यालयात कामानिमित्त आलेल्यांना आल्या पावली परत जावे लागत असून उत्पन्नाचा दाखला, फेरफार, नकाशा, वयोवृद्धांना निराधारासाठी लागणारे दस्तावेज मिळविण्यासाठी कित्येक दिवस प्रतीक्षा करावी लागते. तलाठ्याशी संपर्क साधला असता त्यांचा भ्रमणध्वनीही प्रतिसाद देत नाही. यामुळे सामान्य नगारिकांना त्रास सहन करावा लागत आहे. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या घोराड गावातील तलाठी कार्यालय कुलूपबंद राहावे, ही आश्चर्याचीच बाब म्हणावी लागते. तालुक्याच्या गावालगत असलेल्या घोराड ग्रा.पं. ला एक वर्षापासून तलाठी मिळालेला नाही. कित्येकदा मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. या प्रकारामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना तलाठ्याची प्रतीक्षा करीत ताटकळावे लागते. पंचायत समिती तसेच जि.प. प्रशासनाने याकडे लक्ष देत कारवाई करणे गरजेचे झाले आहे.(वार्ताहर)
घोराडचे तलाठी कार्यालय कुलूपबंद
By admin | Published: May 31, 2015 1:33 AM