वर्धा : दिवसभर शेतशिवारातून काम करून आलेले नागरिक झोपी गेले असता गावात आलेल्या चोरट्यांनीचोरीचा सपाटा लावला. दोन घरी हात साफ करून गावातील शाळेचा आश्रय घेत रात्र काढली. सकाळी शाळा सुरू होताच एका चिमुकलीची नजर या चोरट्यांवर पडताच चोरट्यांनी तिच्यावर सुरा उगारला. पण, तिने मोठ्या धैर्याने ‘चोर.. चोर...’ अशी आरोळी ठोकताच त्यांनी धूम ठोकली. ही एखाद्या कथानकाप्रमाणे वाटणारी घटना देवळी तालुक्यातील हुसनापूर येथे घडली असून, या चोरट्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नागपूर ते यवतमाळ या राष्ट्रीय महामार्गालगत दोनशे ते अडीचशे लोकवस्तीचे हुसनापूर हे गाव आहे. या गावातील नागरिक शेती व मोलमजुरी करतात. चोरट्यांनी १ जानेवारीच्या रात्रीला दिलीप वाहारे यांच्या घरी ५० हजार रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला, तर सुधाकर वाघमारे यांच्या घरातील सर्व सदस्य बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरातील मुद्देमाल पळविला.
दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचे लक्षात आल्यावर गावकऱ्यांनी रात्रीला गस्त घालायला सुरुवात केली. त्यानंतर ३ जानेवारीला चार ते पाच अनोळखी व्यक्ती गावात आढळून आल्याने गस्तीवर असलेल्या नागरिकांनी त्यांचा पाठलाग केला तर ते अंधाराचा फायदा घेऊन शाळेच्या शौचालयात दडून बसले. ग्रामस्थांनी सर्वत्र शोधाशोध करूनही थांगपत्ता लागला नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता गावातील विद्यार्थी शाळेत गेले असता वर्ग चौथीतील विद्यार्थी तनू गणेश वाहारे, कार्तिक तोडासे, नयन महाजन यांनी नेहमीप्रमाणे वर्गाची साफसफाई करायला निघाले. तेव्हा तोंडाला बांधून असलेले पाच व्यक्ती शौचालयाकडून पुढे आले. त्यांनी तनू या मुलीला चॉकलेट देऊ केले; पण तिने नकार देत ‘चोर... चोर’ अशी आरोळी ठोकली. चोरट्यांनी उगारलेला सुरा तिच्या दिशेने फेकत पळ काढला. सुदैवाने तनू यातून बचावली. गावकऱ्यांनी शाळेकडे धाव घेत गर्दी केली. तोपर्यंत ते पाचही चोर शाळेच्या भिंतीवरून उडी घेऊन शेताच्या दिशेने पसार झाले होते. या घटनेने गावात खळबळ उडाली असून, सर्वांनी तनूच्या धाडसाचे कौतुक केले.
तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार
हुसनापूरमध्ये एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी केल्यानंतर तक्रार देण्याकरिता गेलेल्या नागरिकांची तक्रार घेण्यास देवळी पोलिसांनी नकार दिला. पोलिसांनी वेळीच तक्रार दाखल करून तपास केला असता तर चोरट्यांचा गावात मुक्काम राहिला नसता, अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पोलिसांप्रति गावामध्ये रोष व्यक्त होत आहे.