पित्याचा टाहो : प्रेमप्रकरणातून घेतले औषध, तपासावर संशयहिंगणघाट : प्रतिभा ऊर्फ बंटी प्रकाश निखाडे (२७) हिचा १० फेब्रुवारी रोजी संशयास्पद मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला आत्महत्येचा रंग दिला जात असला तरी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप मृतक प्रतिभाचे वडील प्रकाश निखाडे यांनी केला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली; पण पोलीस चौकशी न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही मुलीच्या वडिलांनी केला. याबाबत सोमवारी पत्रपरिषदेतून मृतक मुलीचे आई, वडील, बहिण, भाऊ यांनी माहिती दिली. निखाडे कुटुंबाच्या मते, ८ फेब्रुवारी रोजी प्रतिभा रोटरी क्लबच्या कार्यक्रमातून घरी आली व झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिची प्रकृती अचानक खालावली. तिला वडील दवाखान्यात घेऊन जात असतानाच तिची एक मैत्रीण घरी आली. तिने प्रतिभाला मी स्वत: दवाखान्यात घेऊन जाते, असे सांगून दोघी दवाखान्यात गेल्या. यानंतर एक तासाने मुलीचे जावर्ई केतन तायवाडे यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने फोन करून प्रतिभाला मानधनिया यांच्या दवाखान्यात भरली केले. तिची प्रकृती अत्यंत खराब आहे, असा निरोप दिला. डॉ. मानधनिया यांच्या दवाखान्यात गेलो असता मुलीने उंदीर मारण्याचे औषध घेतल्याचे डॉटरांनी सांगितले. यानंतर सायंकाळी मुलीची प्रकृती गंभीर आहे, तिला सावंगी वा सेवाग्राम येथे घेऊन जाण्याचा सल्ला दिला. रात्री ९.३० वाजता तिला सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असतानाच १० फेबु्रवारी रोजी सकाळी ६.३० वाजता तिचा मृत्यू झाला. याबाबत प्रतिभाचे वडील प्रकाश म्हणाले की, वॉर्डातील एका मुलावर तिचे प्रेम होते. घटनेच्या दिवशी रोटरी उत्सवात तिचा कथित प्रियकरासोबत वाद झाला. त्याने तिला शिवीगाळ केली. यानंतर मोबार्ईलवरून तू मरून जा, मला फरक पडत नाही, असे तिच्याशी बोलणे झाल्याची मोबाईल रेकॉर्डींग आहे. यानंतर तिची मैत्रीण अचानक घरी येते, तिला दवाखान्यात घेऊन जाते, तेथे तो प्रियकरही हजर असतो, हे अनाकलनीय आहे. डॉ. मानधनिया यांनी पोलिसांना सूचना न देताना तिला दवाखान्यात ठेवले. रात्री प्रकृती बिघडल्यानंतर सेवाग्राम येथे नेण्याचा सल्ला दिला. हा प्रकार संशयास्पद आहे. पोलिसांनी प्रतिभा, तिची मैत्रीण व कथित प्रियकर यांच्या मोबाईल रेकॉर्डींगची चौकशी केल्यास वास्तव समोर येईल. या प्रकरणाची चौकशी करून मृत्यूला जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश निखाडे व कुटुंबीयांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
मुलीला आत्महत्येस प्रवृत्त केले
By admin | Published: March 10, 2016 2:53 AM