सेलू : मुलगा नसल्याने मुलींनी पुढाकार घेत आई किंवा वडिलांच्या पार्थिवाला खांदा देत सर्व प्रक्रिया पार पाडल्याचे आपण पाहिले; पण मुले असताना तीने आईला दूर सारल्याने मुलींनी सर्व सोपस्कार पार पाडत आईच्या पार्थिवाला खांदा दिल्याचे येथे समोर आले आहे. येथील ८० वर्षीय गोदाबाई महादेव पराते यांचे निधन झाले. मुले असून जिवंत असताना त्यांना दूर सारले. यामुळे मुलींनी त्यांच्या भावांना कुठल्याही सोपस्कारात सहभागी होण्यास नकार देत त्यांनीच सर्व प्रक्रीया पार पाडली. गोदाबार्इंच्या पार्थिवाला खांदा देत तीनही मुलींनी आईला अखेरचा निरोप दिला. यावेळी सेलूतील मान्यवरांची येथे उपस्थिती होती. सेलू येथील गोदाबाई महादेव पराते यांना चार मुली व तीन मुले आहेत. एक मुलगा आधीच मरण पावला दुसरा गाव सोडून गेल्याने त्याचा पत्ता ठिकाण नाही. तिसरा आहे; पण त्यानेही आईचा सांभाळ करण्याऐवजी तिला दूर सारले. यामुळे त्यांच्यावर मुलीकडे राहण्याची वेळ आली. या मुलीनेच आईचा सांभाळ केला. अखेर १६ एप्रिलला गोदाबाईचे निधन झाले. आईच्या पार्थिवाला खांदा देत तिला अखेरचा निरोप देण्याची वेळ या मुलींवर आली. मुलगा काय आणि मुलगी काय, असे म्हणत पदर खोचून छाया नामक मुलीने स्वत: हातात आकटे पकडले आणि उर्वरित दोन मुलींसह नातेवाईकांनी पार्थिवाला खांदा देत गोदाबाईला अखेरचा निरोप दिला.(तालुका प्रतिनिधी) तेरवी न करण्याचा मुलींचा निर्णयतेरवीसारख्या खर्चिक पद्धतीला फाटा देत या तिन्ही मुलींनी आईच्या निधनानंतर तेरवी न करण्याचा निर्णय घेतला. महिलांनी पुढे येऊन असे ठोस पाऊल उचलले तर समाजाला दिशा देण्याचे काम होऊ शकते, हे त्यांनी कृतीतून दाखविले.
मुलींनी दिला आईला खांदा
By admin | Published: April 18, 2017 1:17 AM