शेतकऱ्यांची मागणी : उत्पादन वाढणार देवळी : कोळोणा (चोरे)सह परिसरातील टाकळी (खोडे), चिखली, अडेगाव, दिघी बोपापूर आदी भागातील शेतकऱ्यांना ओलितासाठी पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता तात्काळ निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना पाण्याची गरज असून विहिरींमधील पाणी पिकांसाठी अपुरे पडत आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी वेळीच मिळाल्यास पिकांची स्थिती सुधारेल असे शेतकरी सांगतात. याकडे संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत ज्याभागातील शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी ओलितासाठी मिळत नाही त्या भागात पाणी पोहचविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. अनेक शेतकरी पावसावर अवलंबून एकच पीक घेतात. त्यातही निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकऱ्यांना फटका सहन करावा लागतो. शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांना वेळीच पाणी मिळाल्यास उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. अनेक शेतकऱ्यांना निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी मिळत नाही. त्यांना एकाच पिकावर समाधान मानावे लागत आहे. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेता निम्न वर्धा प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी सोडण्यात यावे, अशी मागणी एका निवेदनातून रिपाईचे नरेश आेंकार, निरंजन भस्मे, युवराज पोहेकर, नाना थोटे, बबन ओंकार, भाग्यवान भस्मे, प्रशांत मुनेश्वर रविंद्र उपाशे आदींनी केली आहे. सदर मागणीचे निवेदन संबंधीत अधिकाऱ्यांना देण्यात आले असून तात्काळ योग्य कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
निम्न वर्धाचे पाणी शेतासाठी द्या
By admin | Published: February 12, 2017 1:05 AM