वैभव नावडकर : जिल्हा ग्रामीण संरक्षण समितीची बैठकवर्धा : ग्राहकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्यांच्या हक्काबाबत जनजागृती करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक सरंक्षण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी समितीचे सदस्य ज्ञानेश्वर ढगे, बाळकृष्ण माऊस्कर, अजय भोयर, अतुल तराळे, प्रणव जोशी, स्वप्नील मानकर, चंद्रशेखर राठी, संजय बाळकरणे, श्याम अमनेरकर, डॉ. ना. ना. बेहरे, आकाश दाते, समितीचे सचिव व जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल सवाई, महावितरण, बीएसएनएल कंपनीचे अधिकारी आदींची उपस्थिती होती.बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या विजेच्या सुविधा उत्तमरित्या वेळेत देण्यात याव्यात. विशेषत: ट्रान्सफार्मरची क्षमता, पेडपेडिंग प्रकरणे, वीज देयके आदींबाबत महावितरण कंपनीने पंधरा दिवसात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सदस्यांना उपलब्ध करून देण्यात यावा. त्याचबरोबर बैठकीत ग्राहकांच्या हितासंदर्भात शासनाच्या लोकोपयोगी अशा शासन निर्णयाची चर्चा व्हावी त्याबाबत सदस्यांना माहिती देण्यात यावी याविषयी सांगितले. याबरोबरच बैठकीत महावितरण, कृषी, आरोग्य, परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य केंद्रातील रिक्त पदे, शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य, सेवा हमी विधेयक आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच ग्राहक परिषदेच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव त्यांचे अधिकार पोहचविण्यात यावेत. परिषदतर्फे ग्राहकांमध्ये मोठ्याप्रमाणात जनजागृती व्हावी, असेही यावेळी नावडकर म्हणाले. प्रारंभी इतिवृत्ताचे वाचन करून करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल समितीसमोर जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी ठेवला.(शहर प्रतिनिधी)
ग्राहकांच्या हिताला व हक्काला सर्वोच्च प्राधान्य द्या!
By admin | Published: December 02, 2015 2:20 AM