ग्रामदूतमधील प्रकार : शेतकऱ्यांची लुट अल्लीपूर : शेतकऱ्यांना त्यांच्या शेताची फेरफार नोंद, खरेदी विक्रीच्या नोंदवहिच्या संगणकीकृत कागदपत्राकरिता शेतकऱ्यांची लूट सुरू आहे. ग्रामदूत केंद्रात या कामाकरिता २०० रुपये मोजावे लागत आहे. दुष्काळाच्या छायेत पिचल्या गेलेल्या शेतकऱ्यांना हा भुर्दंड न पेलणारा आहे.शेतकऱ्यांच्या शेताच्या फेरफार नोंदी व खरेदी विक्रीच्या नोंदवहीची ६ ‘क’ नमुना कॉपी संगणीकृत करण्याच्या नावाखाली अल्लीपूर येथे लूट सुरू आहे. येथील क्र.१६ ची कागपपत्रे सात-आठ महिन्यांपासून हिंगणघाट येथे जमा करण्यात आली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेती कर्जासाठी लागणारा सातबारा व ८ अ तसेच इतर नकाशे, चतुर्सिमा, उत्पन्न हे पत्र येथून ग्रामदूत मधून देण्यात येते, पण फक्त ‘६ क’ साठी शेतकऱ्यांना हिंगणघाट येथे येरझारा माराव्या लागत आहे. हिंगणघाट येथून अल्लीपूर येथील शेतीचा सातबारा, ८ अ, मात्र मिळत नाही. त्यामुळे काही कागदपत्रे अल्लीपूर व ‘६ क’ साठी २०० रुपये देऊन अथवा आठ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर वर्षाप्रमाणे पैसे भरून फेरफार नोंदवहीची कॉपी घ्यावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेकॉर्ड स्कॅन झाला तर अल्लीपूर येथील ग्रामदूतला का देण्यात शेत नाही, असा प्रश्न शेतकरी वर्ग करीत आहे. घरपोच शेती कागदपत्र योजना विचाराधीन असताना त्याच कागदपत्रासाठी शेतकऱ्यांना कामे सोडून तालुका ठिकाणी जावे लागते. साझा क्र. १६ च्या शेतजमिनीच्या नवीन नकाशा नोंदीत काहींचे पूर्ण शेतच गायब असल्यामुळे जुनाच रेकॉर्ड कायम ठेवण्यात आला आहे. नवीन कार्यक्रमाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागली आहे. शेतीचे अनेक वादग्रस्त प्रकरणे यामुळे प्रलंबित होत आहे. याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.(वार्ताहर)
२०० रुपये द्या, तत्काळ माहिती घ्या
By admin | Published: July 17, 2015 2:15 AM