लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित आहे. या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक तुषार उमाळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचेच नव्हे, तर संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता आहे. स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपर्यंत महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक व साहित्यिक जडणघडणीत साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे प्रचंड मोठे योगदान आहे. समाजव्यवस्थेने कायमच डावललेल्या मातंग समाजाला प्रत्येक प्रश्नासाठी सतत संघर्ष करावा लागतो.
गावात मातंग समाजाची मोठी वस्ती आहे. मात्र, या समाजाला सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमास एकत्रित येण्यास कुठलेही स्थान आणि समाजाची प्रेरणा असणाऱ्या अण्णाभाऊ साठेंचा साधा पुतळादेखील नसल्याने मोठी अडचण समाजापुढे निर्माण झाली आहे. अण्णाभाऊ साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. हा दिवस सामान्यतः पावसाळ्यात येत असल्यामुळे सभागृहाअभावी या दिवशी कुठलेही सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे स्मारक व समाजभवनासाठी भूखंड मिळण्यासाठी संघर्ष सुरू आहे.
तत्कालीन तहसीलदार रमेश कोळपे यांनी २०२२ मध्ये एक महिन्यात भूखंड देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. त्यामुळे उमाळे यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाच्या वतीने वर्धा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक बंडू कासारे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अतुल शेंदरे, जिल्हा सचिव राहुल गजभिये, तालुकाध्यक्ष प्रवीण ढाले. विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष वैभव कदम, विपिन नगराळे, अश्विन परमार, अॅड. कपिलवृक्ष गोडघाटे, शैलेश जगताप, निखिल नगराळे, आकाश मानकर, अजय डोंगरे, प्रशांत डोंगरे, सुनील बावनकर, आलोक चौधरी, अतुल बावणे, नितीन निखाडे, गंगा डोंगरे, वंदना कासारे, मनीषा डोंगरे, सुलभा बावनकर, कांचन बावनकर, मंदा गवळी, आदी उपस्थिती होती.
पंधरवड्याचा अल्टिमेटमयेत्या १५ दिवसांत सेवाग्राम येथे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी व सभा मंडपासाठी भूखंड न दिल्यास वर्धा जिल्ह्यातील मातंग समाज, संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वात तहसील कार्यालयाला घेराव घालेल. त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल असा इशारा यावेळी निवेद- नातून देण्यात आला.