अनुदान अडकले : जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांनाही पाठविले निवेदन वडनेर : विहिरींचे बांधकाम करण्यासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचा खर्च केला; पण ती रक्कम अद्याप शेतकऱ्यांना देण्यात आली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रकरणी चौकशी करून त्वरित विहिरीचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत सरपंच विनोद वानखेडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे.वडनेर येथील शेतकऱ्यांना दोन वर्षांपूर्वी २१ डिसेंबर २०१२ रोजी ग्रामसभेत मंजुरी देऊन रोजगार हमी योजनेतून सिंचन विहिरी देण्यात आल्या. तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी झाली असून शासकीय आदेशानुसार वडनेर येथील १४ लाभार्थ्यांनी मजूर लावून आपल्या शेतात सिंचन विहिरींचे बांधकाम पूर्ण केले; पण अद्यापही शेतकऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देण्यात आलेला नाही. यापूर्वी शेतकऱ्यांनी अनेकदा मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यासह सर्व संबंधित यंत्रणेला निवेदन सादर केली; पण कुणाही वडनेर येथील शेतकऱ्यांची दखल घेतली नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी सिंचन विहिरीचे खोदकाम करायला कुणी सांगितले, ज्यांनी सांगितले असेल त्यांनाच अनुदान मागा, अशी उत्तरे शेतकऱ्यांना दिली. या प्रकारामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.१४ शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असून त्यांच्यावर कर्जाचा डोंगर आहे. त्यांनी कर्ज घेत विहिरी बांधल्या. तो खर्च दुपटीने वाढत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.(वार्ताहर)अन्यथा आत्महत्येची परवानगी द्यावडनेर येथील भीमराव मडावी, सुरेश कुंभारे, शंकर तागडे, शेख ईकबाल शेख अब्दुल, प्रदीप जोगे, हरिभाऊ उमाटे, सुधाकर उमाटे, प्रभाकर गुजरकर, पुरूषोत्तम जागे, प्रशांत घोडमारे, हनुमंत फटींग, रमेश मांगरूटकर, गजानन कुबडे, शंकर भोयर या १४ शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन विहिरींचे बांधकाम केले. ही रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सरपंचाला निवेदन देत सामूहिक आत्महत्येची परवानगी मागितली होती. यामुळे सरपंच वानखेडे यांनीच शेतकऱ्यांकडून शासनाला निवेदन पाठवून खर्च झालेली विहिरीची रक्कम द्या वा आत्महत्येची परवानगी द्या, अशी मागणी केली आहे. या प्रकरणात काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सिंचन विहिरींच्या बांधकामातील थकित रक्कम द्या
By admin | Published: September 20, 2015 2:38 AM