वर्धा : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत महिला कर्मचारी व शिक्षिकांची गैरसोय झाली़ दूरवर ग्रामीण भागात महिला कर्मचाऱ्यांना शौचालय व इतर गैरसोईचा सामना करावा लागला़ शक्यतोवर महिलांची नियुक्ती टाळावी वा आवश्यक झाल्यास आगामी १५ आॅक्टोबरच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत महिला कर्मचारी व शिक्षिकांची नियुक्ती तालुक्यात नजीकच्या व सोईच्या ठिकाणी करावी़ निवडणुकीच्या कामी नियुक्त व मागणी अर्ज नमुना १२ भरून दिलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी म़रा़ प्राथमिक शिक्षक संघाने केली आहे़ याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले़महिला कर्मचाऱ्यांना शक्यतोवर त्यांच्या गावातच द्यावे व एका मतदान केंद्रावर किमान दोन महिला नियुक्त कराव्या़ जेणेकरून त्यांना सोबत होईल व त्यांना मतदान केंद्रावर रात्रीच्या मुक्कामातून सुट द्यावी, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाच्या आहेत़ त्यांचे पालन व्हावे़ मतदान केंद्रावरील मतदान आटोपल्यानंतर महिलांना किमान दोन तासाच्या आत अविलंब कार्यमुक्त करावे़ बऱ्याचदा महिलांना रात्री, पहाटेपर्यंत संकलन केंद्रावर वेळ घालवावा लागतो़ यात फारच गैरसोय होते़ येत्या विधानसभा निवडणुकीत ज्या नियुक्त कर्मचाऱ्यांनी टपाली मतदानाकरिता मागणी अर्ज नमुना १२ भरून दिला आहे, अशा सर्व कर्मचाऱ्यांना टपाली मतपत्रिका पुरवण्यात यावी़ त्यांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा व ते मतदानापासून वंचित राहू नये, अशी मागणीही करण्यात आली़लोकसभा निवडणुकीत टपाली मतपत्रिका कर्मचाऱ्यांना मिळाल्या नाही़ यामुळे त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले़ शिवाय मतदान आटोपल्यानंतर संकलन केंद्रावर एकदम गर्दी होते व रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत संकलनाचे काम चालते़ त्यावेळी संकलन केंद्रावर कर्मचाऱ्यांकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अपुरी असते तर जेवणाची सोय नसतेच़ यामुळे कर्मचाऱ्यांचे हाल होतात़ परतीच्या प्रवासाला गाड्यांची व्यवस्थाही अपूरीच असते़ यामुळे संकलन केंद्रावर शेवटपर्यंत पाणी व जेवणाची व्यवस्था करावी, परतीच्या प्रवासासाठी शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत रात्री उशिरापर्यंत विनामूल्य व्यवस्था करावी, आदी मागण्या प्राथ़ शिक्षक संघाच्या महिला आघाडी अध्यक्ष नीता दाते, सुचिता वाघ यांनी केल्या़ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना लोमेश वऱ्हाडे, वसंत बोडखे आदी उपस्थित होते़(स्थानिक प्रतिनिधी)
महिला कर्मचाऱ्यांना सोईचे ठिकाण द्या
By admin | Published: October 06, 2014 11:17 PM