आष्टी (श़) : येथील प्रगतशील अल्पभूधारक शेतकरी अण्णाजी राणे यांनी महाराष्ट्र जनक्षेत्र सुधार प्रकल्पांतर्गत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची मदत घेत दूध डेअरी प्रकल्प युनिट उभारले़ प्रकल्प पूर्ण झाल्यावरही त्यांना अनुदान देण्याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले़ यबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले़ अधिकारी धास्तावल्याने तब्बल अडीच वर्षांनी अनुदान मिळाले़२०११-१२ मध्ये अण्णाजी राणे यांना पाच लाख रुपयांचे युनिट मंजूर झाले़ त्यासाठी दूध प्रक्रिया केंद्र इमारत बांधकाम केली़ सर्व यंत्र सामुग्री विकत आणली़ मंजूर पाच लाख रुपयांपैकी अडीच लाख लाभार्थी हिस्सा बँक कर्जस्वरूपात तर उर्वरित अडीच लाख कृषी विभागाकडून अनुदानास्वरूपात मिळणार होते़ शेतकरी राणे यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण केली़ त्यानुसार तत्कालीन तालुका कृषी अधिकारी बबन जुनघरे यांनी १ लाख २५ हजार रुपयांचा पहिला अनुदानाचा हप्ता २८ जानेवारी २०१४ रोजी दिला़ उर्वरित दुसऱ्या टप्प्यातील अनुदानासाठी अर्ज केला़ दरम्यान, तालुका कृषी अधिकारी जुनघरे यांची काटोल येथे बदली झाली़ त्यांचा कार्यभार कारंजा (घा़) येथील तालुका कृषी अधिकारी डॉ़ योगिराज जुमडे यांच्याकडे आला़ दुसऱ्या हप्त्याचे १ लाख २५ हजार रुपयांचे अनुदान द्यावे म्हणून राणे यांनी अर्ज केला असता जुमडे यांनी त्यांना त्रास दिला़ बटर चर्नर यंत्र नसल्याचे कारण पूढे करीत अनुदान रोखले़ मूळ कोटेशनमध्येच बटर चर्नर मशीन असल्याने पुन्हा बिलाचा तगादा तालुका कृषी अधिकारी जुमडे यांनी लावला होता़ अनुदान मंजूर करायचे असेल तर २५ हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी केली़ याबाबत १६ एप्रिल १४ रोजी शेतकरी राणे यांनी अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांना लेखी तक्रार दिली़ यानंतर कृषी अधिकाऱ्यांनी प्रकल्प रद्द करण्याचेच पत्र दिले़ याविरूद्ध राणे यांनी आवाज उठविला़ कृषीमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषी आयुक्त उमाकांत दांगट पुणे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ़ विजय घावटे नागपूर यांना निवेदन दिले़ याबाबत लोकमतमध्ये वृत्त उमटताच वरिष्ठांनी दखल घेत कृषी अधीक्षक बऱ्हाटे, तालुका कृषी अधिकारी जुमडे यांना धारेवर धरले़ शिवाय त्वरित अनुदान देण्याचे आदेश दिले़ यावरून डॉ़ जुमडे यांनी २५ जून रोजी लेखी पत्र काढून अनुदान जमा केल्याचे शेतकरी अण्णाजी राणे यांना कळविले़(प्रतिनिधी)
अडीच वर्षांनी मिळाले दूध डेअरीचे अनुदान
By admin | Published: June 30, 2014 12:03 AM