२,६५७ दिव्यांगांनी घेतला लाभ : ७२७ अपंगांना आरोग्य विमा; अपंग साहित्यासाठी ७१२ अपंगांचे मोजमापलोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : डोळे बंद करुन एखादा रस्ता ओलांडून बघितल्यास आपल्याला अंध व्यक्तींच्या समस्यांची जाणीव होते. अशाच संवेदनशील भावनेतून दिव्यांगांच्या सर्व समस्या सोडविण्याचा निश्चय करून जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी त्यांच्या आरोग्य तपासणीपासून सुरुवात केली. हिंगणघाट, समुद्रपूर, पुलगाव आणि आर्वी येथे शनिवारी झालेल्या स्वावलंबन मेळाव्यात २ हजार ६५७ दिव्यांगांची विविध योजनांचा लाभ घेतला असून १ हजार २७३ जणांना वैश्चिक कार्ड देण्यात आले. या शिबिराचे अतिशय काटेकोर नियोजन करण्यात आले होते. दिव्यांगांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आठ दिवसांपूर्वीच आशा स्वयंसेविकेने तपासणीस पात्र असलेल्या व्यक्तींना कोणती कागदपत्रे सोबत न्यायची याची माहिती दिली होती. शिबिराच्या दिवशी त्यांना ने-आण करण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली. याशिवाय त्यांच्या जेवणाचीही व्यवस्था होती. तपासणीसाठी आलेल्या दिव्यांगांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात आली. या शिबिरात ४० टक्क्याच्या वर अपंगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्यांचे २ लाख रुपयांच्या अपंग आरोग्य विमा काढण्यात आले. तसेच देशभर दिव्यांगांना एकच ओळखपत्र देण्यात येत आहे. त्याची नोंदणी यावेळी करुन घेण्यात आली. याला वैश्विक ओळखपत्र असे संबोधण्यात येऊन या ओळखपत्रावरच यापुढे दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. अल्मिको कंपनीमार्फत दिव्यांगांना अपंग साहित्य वाटप करण्यासाठी शारीरिक मोजमाप सुद्धा यावेळी करण्यात आले. संजय गांधी निराधार योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या योजनांचा लाभही दिव्यांगांना देण्यात आला. आरोग्य मेळावा यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागातील अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड तसेच इतर अधिकारी व कर्मचारी, तहसीलदार सचिन यादव, दीपक करांडे, तेजस्वीनी जाधव, विजय पवार, सामाजिक न्याय विभागामधील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
स्वावलंबन मेळाव्यात १,२७३ जणांना वैश्विक ओळखपत्र
By admin | Published: July 03, 2017 1:43 AM