सेलू : निर्मल भारत अभियानानंतर स्वच्छ भारत अभियान जोर पकडत आहे़ यात गावे स्वच्छ करण्याचा ध्यास ग्रा़पं़ सचिव, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांना लागला आहे; पण यात निर्मल ग्राम अभियानाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते़ यामुळे सेलू तालुका गोदरीमुक्त होण्याचे स्वप्न दिवास्वप्न तर ठरणार नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे़ घर तेथे शौचालय अशी शासनाची योजना महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे़ ही योजना अतिक्रमणात वर्षानुवर्षापासून रहिवासी असणाऱ्या परिवारापासून दूर असल्याने गाव गोदरीमुक्त कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे़ गुड मॉर्निंग पथकाची कामगिरी उल्लेखनीय असली तरी गावात हे पथक असेपर्यंतच गाव गोदरीमुक्त झाल्याची प्रचिती येत आहे़ हे पथक त्या गावात जाणे बंद होताच जुनीच परिस्थिती पाहायला मिळत आहे़काही गावांत ऐन शाळेसमोर वा शाळेच्या पटांगणात तर काही ठिकाणी शासकीय कार्यालयाच्या बाजुलाच गोदरी असल्याचे दिसून येते़ यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ आजही गावालगतचा परिसर गोदरीमुक्त झाला नसल्याचे वास्तव आहे़ काही वर्षांपूर्वी बहुतांश गावांत ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले़ आमचे गाव हागणदारीमुक्त झाल्याचे फलक गावाच्या सिमेवर लावून पुरस्कार मिळविले़ या गावात घर तेथे शौचालय झाले; पण गोदरीपासून मुक्तता झाली नाही़ काही गावांत दंडात्मक कारवाईच्या सूचनांचे फलक लावलेत; पण ते फलकच गोदरीच्या कचाट्यात सापडल्याचे चित्र आहे़सेलू पं़स़ कार्यालयापासून बोरधरणपर्यंत जाणाऱ्या मार्गावर घोराड, किन्ही, मोही, हिंगणी, बोरी ही गावे गोदरीमुक्त झाली नाहीत़ अशी अनेक गावे अद्याप हागणदारीमुक्त होण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येते़(शहर प्रतिनिधी)
गोदरीमुक्त तालुका दिवास्वप्नच ठरणार
By admin | Published: December 30, 2014 11:41 PM