मनीष साहू : न्याय पालिकेचा आदर केलाच पाहिजे पुलगाव : गत काही महिन्यांपासून जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रलंबित प्रकरणी माझ्यासह पाच नगरसेवकांना अपात्र घोषित केले. न्याय पालिकेच्या या निर्णयाचा आदर केलाच पाहिजे; परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात यापूर्वीची अनेक प्रकरणे प्रलंबित असताना या प्रकरणाला अग्रक्रम देवून दिलेला निकाल हा राजकीय हेतूने प्रेरित आहे. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मनीष साहू यांनी ‘लोकमत’ला दिली. शिवाय हा निकाल दुर्भाग्यपूर्ण असून त्याचा परिणाम नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली आहे. पाच नगरसेवकांना अपात्र ठरविण्याच्या निर्णयावर पुढे बोलताना ते म्हणाले, आमच्यापैकी पाचही नगरसेवक आपापल्या प्रभागात केलेल्या कामामुळे लोकप्रिय आहेत व अनेकदा निवडून आलेले आहेत. आताही निवडून येण्यास सक्षम आहेत; परंतु आपल्याच पक्षातील सदस्यांनी फटाके फोडून निर्णयाचे स्वागत करावे ही दुर्दैवी बाब आहे. याचे परिणाम काँग्रेस पक्षावर होणार आहे, असे करताना लोकभावनेचा आदर करणे गरजेचे आहे.जिल्हाधिकारी वर्धा यांनी दिलेल्या निकालाविरूद्ध आम्ही उच्च न्यायालयात दाद मागू, असेही ते म्हणाले. याप्रकरणी पक्षश्रेष्ठी काय भूमिका घेणार की या पाचही सदस्य काँग्रेसपक्षातून बाहेर पडणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.(तालुका प्रतिनिधी)
निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार
By admin | Published: June 25, 2016 1:59 AM