राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची कर्मभूमी असलेल्या वर्धा जिल्ह्यात २०१४ च्या मोदी लाटेतही दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने विजय मिळविला होता. यावेळीही काँग्रेसची परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील चारपैकी तीन मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर एका मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवित आहे. देवळी मतदारसंघात शिवसेनेने समीर देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. येथे भाजपचे जिल्हाध्यक्ष बंडखोर म्हणून निवडणूक लढवित आहे. तर हिंगणघाट मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात शिवसेनेच्या माजी आमदाराने बंड केले आहे. देवळी मतदारसंघात विद्यमान काँग्रेस आमदार रणजित कांबळे यांच्यासमोर शिवसेना-भाजपचे उमेदवार समीर देशमुख, बंडखोर अपक्ष उमेदवाराचे तगडे आवाहन आहे. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतविभाजन होण्याची चिन्हे आहेत.
वर्धा विधानसभा मतदार संघात दोनवेळा पराभूत झालेले शेखर शेंडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. त्यांची लढत भाजपचे डॉ. पंकज भोयर यांच्यासोबत आहे. आर्वी मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये थेट लढत आहे. काँग्रेसकडे असलेल्या या मतदार संघात विद्यमान आमदार अमर काळे यांचा सामना भाजपचे दादाराव केचे यांच्याशी आहे. मागील पाच वर्षांत ग्रामीण भागात भाजपने जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. साडेबारा वर्षांपासून अॅन्टी इनकम्बन्सी या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर काँग्रेससमोर आहे.
अशीच अॅन्टी इनकम्बन्सी देवळी मतदारसंघातही दिसून येत आहे. आर्वीत भाजपला विजयाची मोठी आशा आहे. हिंगणघाट मतदारसंघात भाजपचे समीर कुणावार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. राजू तिमांडे व शिवसेना बंडखोर अशोक शिंदे यांच्यात लढत आहे. गेल्यावेळी ६५ हजार मतांनी विजयी होणारे कुणावार यांचे मताधिक्य या निवडणुकीत घटण्याची शक्यता आहे. संपूर्ण वर्धा जिल्ह्याच्या चार मतदारसंघात जातीय समीकरणाने मोठी उचल खाल्ल्याचे चित्र आहे.
हिंगणघाट मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस लढत आहे. तर वर्ध्यातून राष्ट्रवादीची काँग्रेसला साथ आहे. देवळी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेचे समीर देशमुख यांच्या प्रचाराला लागली आहे. आर्वी मतदारसंघात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या तंबूत शिरले आहेत. वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी, दलित, मुस्लिम मतदार यांच्यात होणाऱ्या विभाजनावर निवडणुकांचे निकाल अवलंबून आहे. वर्धा, आर्वी या मतदारसंघात भाजप-काँग्रेसमध्येच थेट लढत आहे.देवळी मतदारसंघात काँग्रेस आ. रणजित कांबळेंसह १४ उमेदवार रिंगणात आहेत. येथे अपक्ष उमेदवारही तगडे असल्याने मतविभाजन कोण किती प्रमाणात करतो, यावर येथील निकाल अवलंबून राहणार आहे.