लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: सेवाग्राम आणि सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात उपचार घेत असलेले वर्धा जिल्ह्यातील चार रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने गुरुवारी त्यांना घरी सोडण्यात आले. ग्रीन झोनमधील जिल्ह्यात १० मे रोजी कोरानाचा शिरकाव झाला. त्यानंतर चोर पावलांनी जिल्ह्यातील रुग्णसंख्या हळूहळू वाढत गेली.महिन्याभराच्या आतच जिल्ह्यातील सर्व रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला कोरोना वाढीला ब्रेक लावण्यात यश आले आहे.जिल्ह्यामध्ये आर्वी तालुक्यातील हिवरा तांडा येथील मृत महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण आठ रुग्ण आढळून आले असून त्यामध्ये आर्वी तालुक्यातील दोन, आष्टी एक, हिंगणघाट दोन व वर्धा तालुक्यातील ३ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी आर्वी तालुक्यातील एका रुग्णाचा मृत्यू पश्चात कोरोपा पॉझिटिव्ह अहवाल आला तर वर्धा तालुक्यातील एक व्यक्ती सिकंदराबादमध्ये उपचारादरम्यान कोरोनाबाधित आढळून आला. त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील सहा रुग्णांवर सेवाग्राम व सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. जिल्ह्यातील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आधीच सुटी देण्यात आली. तर हिंगणघाट तालुक्यातील पती-पत्नी आणि वर्धा तालुक्यातील परिचारिका महिला आणि त्यांची नातेवाईक यांच्यावर कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे) येथे उपचार सुरू होते. चारही रुग्ण मुंबईमधून परत आलेले आहेत. त्यांना शासनाच्या मार्गदर्शक नियमानुसार कोरोनामुक्त झाल्यामुळे गुुरुवारी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच त्यांना पुढे सात दिवस गृह विलगिकरणात राहण्यास सांगण्यात आले. यावेळी दोन्ही रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस यांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला.
बाहेर जिल्ह्यातील तिघांवर उपचारजिल्ह्यामध्ये बाहेर जिल्ह्यातून आलेल्या रुग्णांची संख्याच अधिक होती. आतापर्यंत बाहेर जिल्ह्यातील १२ रुग्ण वर्ध्यातील सेवाग्राम व सावंगीच्या रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले होते. त्यापैकी वाशिम आणि धामणगाव येथील दोन रुग्णांचा मृत्यू झाला. तर सात रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. आता उर्वरित ३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.