लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : समाजातील शेवटच्या घटकाला योग्य आणि मोफत उपचार मिळावे, याकरिता जिल्हा स्तरावर सामान्य रुग्णालयाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी गरिबांपासून तर सर्वसामान्य नागरिक नियमित उपचार घ्यायला येतात. येथील रुग्णांना सर्व उपचार व औषधे मोफत देण्याची व्यवस्था शासनाकडून करण्यात आली असून त्याकरिता चिठ्ठीमुक्त योजनाही अमलात आणली. पण, या रुग्णालयात वर्षभरापासून कफसिरप तर महिन्याभरापासून अॅसिडिटीची गोळीच उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरुन औषधे विकत घ्यावी लागत आहे. इतरही औषधे नसल्याने ती बाहेरुन घ्यायला सांगत असल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय नावाचा सरकारी, औषध खरेदीमुळे आजारापेक्षा उपचारच ठरतोय भारी, अशी रुग्णांची गत असल्याचे चित्र बुधवारी रुग्णालयाचा फेरफटका मारला असता निदर्शनास आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात तीन वर्षांपासून चिठ्ठीमुक्त योजना राबविली जात आहे. सुरुवातीला या योजनेची प्रभावी अंमलबजाणी करण्यात आली. पण, सध्या मात्र ही योजना बारगळल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या रुग्णालयाल ग्रामीण भागातील गरीब व गरजू परिवारातील रुग्ण मोठ्या प्रमाणात येतात. त्यातील बहुतांश रुग्ण अशिक्षित असल्याने त्यांना योजनेची फारशी माहिती नसते. याचाच फायदा उचलत रुग्णांना औषधी लिहून देत त्या बाहेरुन घेण्यास सांगतात. येथे उपचार घेतल्यानंतर रुग्णाला काही दिवसापर्यंत औषध घ्यावे लागते. ती औषधे रुग्णालयाच्या मेडिकलमधून मोफत मिळणे बंधनकारक आहे. पण, रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरच्या मेडिकलमधून घ्यावी लागत आहे. येथे सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे पण, गेल्या वर्षभरापासून कफसिरपच नाही. तसेच अॅसिडिटीचे बरेच रुग्ण असून त्यासाठी आवश्यक असलेली ओमेझ ही गोळीसुद्धा नसल्याचे पुढे आले आहे. सामान्यत: ज्या आजाराचे रुग्ण सर्वाधिक असतात त्याच आजारासाठी आवश्यक असलेली औषधे व गोळ्या रुग्णालयात मिळत नाही. नुकताच एका महिलेची स्नुषा रुग्णालयात काही उपचार घेण्याकरिता दाखल झाली होती. तिला रुग्णालयातून सुटी झाल्यानंतर एका चिठ्ठीवर औषधे लिहून देत बाहेरुन घेण्यास सांगितले. त्या चिठ्ठीवर ना कोणत्या डॅाक्टरांची स्वाक्षरी आहे ना, सामान्य रुग्णालयाचा शिक्का किंवा उल्लेख आहे. साध्या कागदावरच औषधे लिहून देण्यात आली. उपचारादरम्यान बरीच औषधे बाहेरून आणायला सांगतात, असेही काही रुग्णांनी यावेळी ‘लोकमत’ च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
मनोरुग्णांची होतेय फरफट जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून तब्बल १ हजार ५०० हून अधिक मनोरुग्णांना योग्य औषधोउपचार दिला जातो. असे असले तरी मनोरुग्णांसाठी लागणारी चार औषधे सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध नाही. त्यामुळे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या मनोरुग्णांची फरफट होत आहे. आठवड्यातून सहा दिवस मनोरुग्णांना आरोग्य सेवा दिली जाते पण, औषधाअभावी या सेवेतही अडचणी निर्माण होत आहे.
किमान २०० रुपयांचा बसतोय फटका दिवसभर रोजमजुरी करून २०० रुपये कमविणाऱ्या अनेक व्यक्ती चांगली व कमी खर्चाची आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा सामान्य रुग्णालयात येतात. पण, या रुग्णालयात विविध औषधांचा तुटवडा असल्याने त्यांना खासगी मेडिकल शॉपमधून औषधांची खरेदी करावी लागते. खासगी मेडिकल शॉपमधून औषधे खरेदी करताना किमान २०० ते ३०० रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे रुग्णांकडून सांगण्यात आले आहे.
रुग्णालयाकडून निविदा प्रक्रियेवर ठेवतात बोटज्या औषधांचा तुटवडा सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आहे. ती औषधे खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण करुन औषधे खरेदी केली जातील, असे सांगण्यात आले. मात्र, येथे काही औषधे वर्षभरापासून तर काही औषधे महिन्याभरापासून नसल्याने वर्षभरापासूनच निविदा प्रक्रिया सुरु आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘सीएस’चे माहिती देण्याकरिता असहकारभंडारा येथील रुग्णालयातील घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयातील वस्तुस्थिती जाणून घेण्याकरिता ’लोकमत’ सतत पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाची बाजू जाणून घेण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. सचिन तडस यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्यासाठी गेल्यावर माहिती न देता ते दालनातून निघून गेले. तसेच भ्रमणध्वनीवर वारंवार संपर्क करुनही ते प्रतिसाद देत नाहीत.