लोकमत न्यूज नेटवर्कसेलू (घोराड) : तालुक्यात असलेली वनराई व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या बोरधारण येथील पाटबंधारे विभागाच्या मालकीचे विश्रामगृह धूळखात पडले असून ही इमारत पत्रकार भवनासाठी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या विश्रामगृहाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी शासनाने पावले उचलण्याची गरज असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बोरधारण येथे सुमारे ३५ ते ४० वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाच्या वतीने तालुक्यातील निसर्गरम्य वातावरणाच्या सान्निध्यात बांधले गेले. मात्र, आजघडीला या विश्रामगृहाची वास्तू धूळखात पडली असून यावर केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला आहे. ती वास्तू आज या विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे निकामी झाली असून सभोवताली उंच झाडाझुडपांचा विळखा असून प्रवेश घेण्यासही थरकाप सुटतो.मोठे दगड, चुना व डिंक टाकून बांधलेली ही वास्तू पाटबंधारे उपविभाग सेलू येथे उपविभागीय अधिकारी मांडले जेव्हापर्यंत कार्यरत होते तेव्हापर्यंत इमारतीच्या देखभाल-दुरुस्तीकडे विशेष लक्ष दिले जात होते. तेव्हा इमारत परिसरही स्वच्छ होता. बौद्ध विहाराजवळ असलेल्या इमारतीत रब्बी हंगामाबाबत दरवर्षी परिसरातील शेतकऱ्यांच्या बैठका आयोजित केल्या जात असे. माजी आमदार व विधानसभा उपाध्यक्ष प्रमोद शेंडे यांचा पुढाकार होता. यात शेतकरी बांधवांना त्यांच्या अडीअडचणींबाबत विचारणा करून ऑन द स्पॉट अधिकाऱ्याला बोलावून तक्रारीचे निवारण केले जात होते. त्यानंतर तर जेव्हा या विश्रामगृहाचे दिवस पालटले आता तेव्हा ते भंगार अवस्थेत पडून आहे. अनेकांना तर पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असलेले विश्रामगृह येथे असल्याचेही आठवणीत आहे किंवा नाही, यात ही शंका वर्तविल्या जात आहेत.सध्या विभागातील कामे ठप्प असल्यामुळे कुणी अधिकारी फिरकताना किंवा कार्यालयातही दिसत नाही. कधी काळी सेलू पाटबंधारे उपविभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या पाच शाखांत जवळपास ३०० ते ३५० कर्मचारी कार्यरत होते. तेव्हाचे सीआरटी (कन्फर्म रेग्युलर टेम्पररी) कर्मचारी सेवानिवृत्त झाले तर काहींचे निधनही झाले. परंतु, त्यांच्यातील एकाही वारसांना कोणत्याही कामावर घेतले नाही. तसेच रिक्त जागेवर भरतीही करण्यात आली नाही. आज फक्त या कार्यालयातून उंटावर बसून शेळ्या हाकण्याचे काम सुरू आहे.
देखभाल-दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी जोरात...- या विश्रामगृहाच्या वास्तूला एकही तडा गेलेला नसून, ती आजही डौलात उभी आहे. मात्र, देखभाल व दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागातील अधिकारी लक्ष देणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. या विभागात अधिकारी व कर्मचारी आहेत किंवा नाहीत, हा विषयच बनला आहे. सेलू व हिंगणी येथील या विभागाची कर्मचारी वसाहत शेवटच्या घटका मोजत आहे तर केळझर येथील वसाहत मोडकळीस आली आहे. साध्या पाट दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांना कार्यालयात गेल्यावर अधिकारी सापडत नाहीत, तर त्या विश्रामगृहावर कोण राहणा, असा प्रश्न आहे.
लोकप्रतिनिधींना जाग येणार केव्हा?- बोरधारण परिसरात येणाऱ्यांना बसण्याची व्यवस्था देखील नाही. असे पर्यटनस्थळ शोधून सापडणार नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने याकडे दुर्लक्ष होत असेल तर ती इमारत तालुक्यातील पत्रकारांसाठी देऊन त्या विश्रामगृहाला पत्रकार भवन असे नाव द्यावे, अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात येत आहे.