शासनाने खेळाडू कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करावी $$्निरामदास तडस : महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचा समारोप, सर्वसाधारण विजेतेपद चंद्रपूर जिल्ह्याला वर्धा : राज्य शासनाने क्रीडा धोरणामध्ये बदल करून विभागीय स्तरावरील प्रावीण्यप्राप्त खेळाडू कर्मचारी आणि अधिकारी यांना नोकरीमध्ये पदोन्नतीची संधी उपलब्ध करून द्यावी, असे मत खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. जिल्हा क्रीडा संकूल येथे महसूल विभागीय क्रीडा सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे पुरस्कार वितरण विकास भवन येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल, नागपूर विभागाचे महसूल उपायुक्त जितेंद्र पापळकर, फडके, अति. जिल्हाधिकारी संजय दैने यांच्या हस्ते करण्यात आले. या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. ते पूढे म्हणाले की, महाराष्ट्राला खाशाबा जाधव सारख्या खेळाडूंचा इतिहास लाभलेला आहे. आजपर्यंत आॅलम्पिकमध्ये ख्वाशाबा जाधव या एकाच कुस्तीपटूने महाराष्ट्राचे नेतृत्व केले; पण राज्य शासनाने या खेळाडूला पोलीस निरीक्षक शिवाय कोणत्याही प्रकारची पदोन्नती दिलेली नाही. राज्यासाठी ही दुर्भाग्याची बाब आहे. यासाठी शासनाने खेळाडूंना खेळासोबतच नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. खेळामध्ये हार-जीतला महत्त्व नसून त्यात भाग घेणे महत्त्वाचे आहे. या स्पर्धेत सर्व अधिकारी, कर्मचारी खेळाडूंनी खेळामध्ये भाग घेऊन खेळाचे कौशल्य दाखविले, ही आनंदाची बाब आहे. कर्मचारी व अधिकारी खेळाडू यांनी निष्काम कर्म याची भावना ठेवून केवळ खेळातच नव्हे तर शासकीय कामकाज करावे. यासाठी चांगले ते घ्यावे आणि वाईट ते सोडून द्यावे, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले. धकाधकीच्या जीवनात कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाचे कर्तव्य जोपासून क्रीडा स्पर्धेत सहभाग घेतला, ही गौरवाची बाब आहे. सर्व स्तरातील सर्व संवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी खांद्याला खांदा लावून एकजुटीने स्पर्धेत खेळाचे प्रदर्शन केले. राज्यपातळीवर विभागीय चमूने अशीच चांगली कामगिरी बजावावी व स्पर्धेत जय पराजयातील उणीवा दूर करून पुढील वर्षाच्या स्पर्धेसाठी तयारी करावी, अशा शुभेच्छा जितेंद्र पापळकर यांनी दिल्या. तीन दिवस चाललेल्या स्पर्धेतील विजेता, उपविजेता संघ आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारात खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते पदक तसेच चषक देऊन गौरविण्यात आले. यात एकेरी बॅडमिंटन खेळात जिल्हाधिकारी शैलेश नवाल उपविजयी ठरले आणि सांघिक खेळात महिला थ्रो-बॉलमध्ये वर्धा संघ विजयी आणि चंद्रपूर जिल्हा उपविजेता ठरला. खो-खो पुरूष गडचिरोली विजयी तर भंडारा उपविजयी, फुटबॉल नागपूर विजयी तर वर्धा उपविजयी, कबड्डी भंडारा विजयी तर चंद्रपूर उपविजयी, व्हॉलीबॉल गडचिरोली विजयी तर नागपूर उपविजयी, महिला खो-खो वर्धा विजयी तर चंद्रपूर उपविजयी, क्रिकेट गोंदिया विजयी तर वर्धा उपविजयी ठरला आहे. सांस्कृतिक आणि क्रीडा स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद चंद्रपूर जिल्ह्याला प्राप्त झाले.(कार्यालय प्रतिनिधी)
शासनाने खेळाडू कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करावी $$्निरामदास तडस : महसूल विभागीय क्रीडा स्पर्धेचा समारोप, सर्वसाधारण विजेतेपद चंद्रपूर जिल्ह्याला
By admin | Published: March 08, 2017 1:47 AM