लोकमत न्यूज नेटवर्कआर्वी : विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर सहभागी झाले होते. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने सादर केले.शेतकरी व कष्टकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आर्वी, आष्टी व कारंजा या विभागातील शेतकरी, बेरोजगार तरूण, शेतमजुरांनी आ. अमर काळे यांच्या नेतृत्त्वात एकत्र येत उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना विविध मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले. त्यानंतर स्थानिक छत्रपती शिवाजी चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतरण झाले.आर्वी उपविभागातील धरणात ३४ टक्के पाणीसाठा आहे. या अल्पसाठ्यात सिंचनाची सोय कशी होणार, नापिकी, बोंडअळीचे अनुदान प्रकल्पग्रस्तांना एक रकमी १० लाखांची मदत या सर्व परिस्थितीची जाण या सरकारला व्हावी यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचे यावेळी आ. काळे यांनी सांगितले.आर्वी, आष्टी, कारंजा हे तीनही तालुके मध्यम दुष्काळ म्हणून जाहीर केले आहे. ते तीव्र दुष्काळ म्हणून जाहीर करावे. याची दखल शासनाने घेतली नाही तर पुढच्या काळात याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही याप्रसंगी त्यांनी दिला. शेतकऱ्याप्रती हे सरकार लबाडी करीत असल्याचा आरोप यावेळी आ. काळे यांनी केला.मुख्यमंत्री विदर्भाचे असल्याने त्यांच्याकडून अधिक अपेक्षा असताना मुख्यमंत्रीही शेतकºयांच्या मदतीप्रती उदासीन आहे. तर दुसरीकडे नागपूर-मुंबई या समृद्धी मार्गासाठी ४६ करोडचा निधी खर्च करण्यात येत असल्याची टिका त्यांनी यावेळी केली. याबाबत पुढील काळात दुष्काळाची लढाई तीव्र करू. आर्वी उपविभागातील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कुटूंबियांना १० लाखांची मदत करण्यात यावी. बोंडअळीचे अनुदान त्वरीत द्यावे. दिवसा १० तास विद्युत पुरवठा कृषीपंपांना देण्यात यावा, आदी मागण्या या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आल्या आहेत. सभेचे सभेचे संचालन प्रा. पंकज वाघमारे यांनी केले. आर्वी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकऱ्यांप्रती सरकार कुंभकर्णी झोपेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 12:16 AM
विदर्भात व आर्वी उपविभागात भीषण कोरड्या दुष्काळाचे सावट असताना शेतकऱ्यांप्रती शासन उदासीन असल्याचा आरोप करीत कॉँग्रेसचे आमदार अमर काळे यांच्या नेतृत्वात मोर्चा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर नेण्यात आला.
ठळक मुद्देशेतकरी व कष्टकऱ्यांची उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयावर धडक