वर्धा : जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेसह विविध योजनांतून विकासाची कामे करताना ती गुणवत्तापूर्वक, कालमर्यादेत व पारदर्शकपणे होणे आवश्यक आहे. विभागांनी कामे करताना या बाबीचे पालन केले पाहिजे. जिल्ह्याला विकासाच्या बाबतीत पुढे नेण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने व सेवाभावनेतून काम करावे, अशा सूचना वने, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हा परिषदेच्या सिंधुताई सपकाळ सभागृहात विविध विभागांच्या विकास योजनांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपवनसंरक्षक राकेश सेपट उपस्थित होते. शिक्षण सर्व समाजाच्या प्रगतीचा पाया असून, समाजातील प्रत्येक घटकाला दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. शेतकरी ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी क्षेत्रात बदल करण्याची गरज आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
शासन शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविते. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देऊन कृषी क्षेत्रात बदल घडविण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे महत्त्वाचे आहे. कृषि विभागाने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करून सेंद्रिय शेती, कृषी प्रक्रिया उद्योग, शेतकरी प्रशिक्षण, पॉली हाऊस, कृषी वाचनालय, दुग्ध योजना, वनशेती, माती परीक्षण, ड्रोन फवारणी याबाबत जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सुरुवातीस जिल्ह्यात विविध विभागांमार्फत सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. बैठकीला सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
निराधारांचे मानधन वेळेत जमा करा
शासनाने निराधार योजनेच्या अनुदानात वाढ केली असून, त्यांना १२० दिवसांत अनुदान देणे अपेक्षित आहे. असे असताना काही ठिकाणी दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. याबाबत स्वतंत्र बैठक घेऊन अनुदान वेळेवर लाभार्थींच्या खात्यात जमा होईल याकडे लक्ष द्यावे.
जिल्ह्यातील जीर्ण अवस्थेत असलेल्या शासकीय रुग्णालयांच्या बांधकामासाठी तत्काळ प्रस्ताव सादर करावा. रुग्णालयांमध्ये पर्याप्त प्रमाणात औषधी साठा उपलब्ध ठेवावा. रुग्णालयातील स्वच्छता, पाणी, बैठक व्यवस्था याकडे लक्ष सांगितले.
आमदारांनीही वेधले लक्ष
- आमदार समीर कुणावार : यांनी काही प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्थानांतरण, जीर्ण झालेल्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम, नव्याने बांधण्यात आलेल्या नगर परिषद इमारतीच्या फर्निचर याकरिता निधीच्या मागणीसह शेतकऱ्यांना दिवसा वीज तसेच हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाच्या श्रेणीवाढीचा मुद्दा उपस्थित केला.
- आमदार दादाराव केचे : यांनी आर्वी, आष्टी व कारंजा तालुक्यातील नदी काठावरील गावांच्या पूर संरक्षण भिंतीच्या बांधकामासाठी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. आरोग्य केंद्रातील रिक्त वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे तातडीने भरण्याबाबत प्रश्न उपस्थित करुन प्रशासनाचे लक्ष वेधले.