राजेश सोळंकी
वर्धा : आर्वी येथील कदम हॉस्पिटलमधील अवैध गर्भपातामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपीचा पती डॉ. नीरज कदम हा आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून सेवा द्यायचा. हे प्रकरण उजेडात येण्यापूर्वी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात महिन्याला किमान २०० प्रसूती व्हायच्या. मात्र, अवैध गर्भपाताचे प्रकरण उघडकीस आल्यावर उपजिल्हा रुग्णालयातील प्रसूतींची संख्याच रोडावल्याने अवैध गर्भपात कदम हॉस्पिटलमध्ये; पण झळ मात्र उपजिल्हा रुग्णालयाला असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विशेष म्हणजे १ ते ३१ जानेवारी या काळात आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात केवळ ७० महिलांची प्रसूती झाली आहे.
तीन तालुक्यांसाठी आधारस्तंभ
आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील महिला प्रसूतीसाठी दाखल होतात. इतकेच नव्हे तर विविध आजारांचे रुग्ण या रुग्णालयातील डॉक्टरांना देवाचा दर्जा देत उपचारासाठी येतात. त्यामुळे हे रुग्णालय तीन तालुक्यांतील नागरिकांसाठी आधारस्तंभच आहे. उल्लेखनीय म्हणजे या रुग्णालयात वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या अमरावती जिल्ह्यातील महिलाही प्रसूतीसाठी येतात.
बालमृत्यू दर शून्य
सर्वाेत्तम नाही पण चांगल्या सुविधांनी परिपूर्ण असलेल्या आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात एरवी प्रत्येक महिन्याला सरासरी १५० नॉर्मल तर ५० सिझर अशा किमान एकूण २०० प्रसूती व्हायच्या. तशी नोंद रुग्णालय प्रशासनाने घेतली आहे. योग्य वेळी योग्य उपचार मिळत असल्याने बालमृत्यूचे प्रमाणही शून्य आहे.
स्त्रीरोग तज्ज्ञ कोविड बाधित आल्याने कामकाजावर झाला परिणाम
आरोपी डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी अटक केल्यावर अवैध गर्भपाताची आरोग्य विभागाकडून चौकशी केली जात असताना उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञ यांचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्या वैद्यकीय रजेवर होत्या. परिणामी या रुग्णालयातील प्रसूती विभागातील कामकाजावर परिणाम झाला. विशेष म्हणजे प्रसूती तज्ज्ञाची वेळीच व्यवस्था करावी अशी मागणी असताना त्याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
माझ्या पत्नीची ट्रिटमेंट आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात सुरू होती. परंतु, असा प्रकार झाला आणि माझी पत्नी कविताला जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसूतीसाठी रेफर करण्यात आले. त्यानंतर सावंगी येथील रुग्णालयात कविताची प्रसूती करावी लागली.
- राजेश शिरघरे, प्रकल्पग्रस्त शेतकरी.
कोविडमुक्त झालेल्या स्त्री व प्रसूती तज्ज्ञ महिला डॉक्टर कर्तव्यावर रुजू झाल्या आहेत. हळूहळू प्रसूती विभागाचे कामकाज पूर्वपदावर येत आहे. मात्र. डॉ. नीरज कदम यांच्या जागी आर्वीच्या उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून सध्या कुणी रुजू झालेले नाही. जिल्हा शल्य चिकित्सक ही नियुक्ती करणार आहेत.
- डॉ. मोहन सुटे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, आर्वी.