शाळा सिद्धीला ब्रेक : १५०७ शाळांचे गे्रडेशन रूपेश खैरी वर्धा राज्याच्या शिक्षण विभागाकडून या शैक्षणिक सत्रात शाळांचा दर्जा ठरविण्याकरिता सुरू केलेल्या शाळा सिद्धीच्या प्रक्रियेची गती मंदावली आहे. या कामाला आता जून वा जुलै महिन्यात प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी जिल्ह्यातील शाळांचे ग्रेडेशन निश्चित झाले असून १२६ शाळा ‘ए ग्रेड’ मध्ये आल्यात. या शाळांची पाहणी शिक्षण विभागाचे अधिकारी उन्हाळ्यानंतर करतील, असे सांगण्यात आले. शाळा सिद्धीला प्रारंभी मोठा विरोध झाला होता. अखेर शासनाचा उपक्रम म्हणून त्याचा स्वीकार झाला. या उपक्रमात सहभागी होण्याकरिता आॅनलाईन अर्ज करणे अनिवार्य होते. त्यानुसार जि.प. च्या सर्व १५०७ शाळांकडून आॅनलाईन अर्ज करण्यात आले. यानुसार तब्बल १२६ शाळांना ‘ए ग्रेड’ देण्यात आला आहे. ५१८ शाळांना ‘बी’, ५५५ शाळांना ‘सी’ व ३०८ शाळांना ‘डी ग्रेड’ देण्यात आला आहे. ग्रेड दिल्यानंतर राज्यस्तरीय समिती शाळांची पाहणी करणार होती; पण उन्हामुळे ती पुढे ढकलल्याचे शिक्षण विभागाद्वारे सांगण्यात आले. या शाळांचा सर्व्हे जून वा जुलैमध्ये होणार आहे. महिना ठरला; पण दिनांक निश्चित नाही. यामुळे सर्व्हे नेमका कधी व कसा होईल, याबाबत साशंकता आहे. सर्व्हे उन्हामुळे रद्द झाला की अधिकाऱ्यांतील ज्येष्ठतेच्या कारणावरून, यावर शिक्षण विभागात चर्वन सुरू आहे. यामुळे शाळा सिद्धीत बसणाऱ्या शाळांना किमान एक महिना प्रतीक्षा करावी लागणार आहे, हे खरे! आतापर्यंत शाळेची गुणवत्ता श्रेणीनुसार ठरत होती. ती आता ग्रेडनुसार ठरणार आहे. याच ग्रेडेशन पद्धतीला शिक्षण विभागाने शाळा सिद्धी असे नाव दिले. पूर्वी श्रेणी पद्धतीत १०० गुणांची परीक्षा होती. यात शाळा परिसर, विद्यार्थ्यांची गुणवत्ता, इमारत आदी बाबी तपासत. यानुसार गुणांकण होई. नव्या पद्धतीत याच बाबी तपासणार असून ९९९ गुण देण्यात आले आहे. ‘सी ग्रेड’ मध्ये सर्वाधिक शाळा जिल्ह्यातील सर्वच शाळांनी आॅनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार शाळांचे ग्रेड ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक शाळा सी ग्रेड मध्ये आल्याचे दिसून आले. जिल्ह्यातील तब्बल ५५५ शाळांना सी ग्रेड मिळाला तर डी ग्रेड मध्ये ३०८ शाळा आहेत. लाहोरी शाळेला ९९९ पैकी ९९७ गुण जि.प. च्या लाहोरी येथील शाळेला सर्वाधिक गुण प्राप्त झाले. या शाळेला ९९७ गुण असून पूर्ण गुणांपैकी केवळ दोन गुण कमी आहे. यामुळे सदर शाळेकडे शिक्षण विभाग विशेष लक्ष देणार असल्याचे शिक्षण विभागातील सुत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात १२६ शाळांना ‘ए ग्रेड’
By admin | Published: April 27, 2017 12:40 AM