आनंद इंगोले
वर्धा : राज्यात सत्ता परिवर्तन झाले की, त्याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही परिणाम होतो. त्यामुळे आता होऊ घातलेल्या ११३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवरही त्याचा परिणाम पडला होता. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपच्या वाट्याला गेल्या. ११३ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ६८ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थित पॅनलने झेंडा रोवला, तर काँग्रेसला त्यापेक्षा निम्म्यावरच समाधान मानावे लागले होते. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस पाडाव करणार का? असा प्रश्न आहे.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर असल्या तरीही ग्रामपंचायत निवडणूक याची रंगीत तालीम समजली जाते. त्यामुळे या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांकडून कंबर कसली आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनाही जोमात आली होती; पण अवघ्या अडीच वर्षांत सत्तांतरण झाल्याने भाजपने पुन्हा गावागावापर्यंत मोर्चेबांधणीला जोर दिल्याचे दिसून येत आहे.
परिणामी, जिल्ह्यात होऊ घातलेल्या १३३ ग्रामपंचायतींपैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आल्या असून त्यातील ३ ग्रामपंचायती भाजप समर्थित आहेत. या ११३ ग्रामपंचायतींच्या पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये चारही विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ६८ ग्रामपंचायती भारतीय जनता पार्टीच्या निवडून आल्या होत्या. काँग्रेसला ३२ ग्रामपंचायतींवर समाधान मानावे लागले, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बोटावर मोजण्याइतक्याच ग्रामपंचायती निवडून आणता आल्या.
सध्या राज्यात आणि केंद्रातही भाजपचे सरकार आहे. चारपैकी तीन आमदार आणि खासदारही भाजपचेच आहे. विशेषत: भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचारात उतरल्याचे चित्र आहे; परंतु काँग्रेसमध्ये असे चित्र पाहावयास मिळत नाही, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते निवडणुकीच्या प्रचारात घसा कोरडा करून तळवे झिजवत आहेत; परंतु नेतेमंडळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मिसळत नसल्याने अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे. आता हा डोंगर सर करून कितपत यश मिळविता येईल, हे येणारा काळच सांगेल.
कोणत्या पक्षाकडे किती ग्रामपंचायती?
विधानसभा - भाजप - काँग्रेस - राकाँ - शिवसेना - इतर
- वर्धा - ११ - ०६ - ०२ - ०० - ०१
- देवळी - १२ - ११ - ०० - ०० - ०१
- हिंगणघाट - १७ - ०१ - ०१ - ०० - ०१
- आर्वी - २८ - १४ - ०० - ०१ - ०६
या ११३ ग्रामपंचायती दृष्टिक्षेपात
(सन-२०१७ च्या निकालानुसार)
एकूण ग्रामपंचायती - ११३
- भाजप - ६८
- काँग्रेस - ३२
- राष्ट्रवादी काँग्रेस - ०३
- शिवसेना - ०१
- इतर - ०९
आज प्रचारतोफा थंडावणार!
जिल्ह्यातील ११३ ग्रामपंचायतींकरिता रविवारी १८ डिसेंबरला मतदान होणार असल्याने १६ डिसेंबरला रात्री प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे आज शुक्रवारी प्रत्येक उमेदवाराकडून शक्तिप्रदर्शनाने प्रचाराची सांगता होणार आहे. यासाठी पक्ष आणि उमेदवारांनीही जोरदार तयारी चालविली आहे.
भाजपकडून ग्रामपंचायत निवडणुकीला महत्त्व दिले आहे. स्थानिक नेत्यांना प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी दिली असून आमदार व खासदारही या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे ११३ ग्रामपंचायतींपैकी ६० टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायती निवडून आणण्याचा संकल्प आहे.
- सुनील गफाट, अध्यक्ष, भाजप
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा विचार करावा लागतो. त्यामुळे गावपातळीवर त्यांनाच प्राधान्य देऊन सर्वच ग्रामपंचायतींमध्ये काँग्रेसचे पॅनल उभे केले आहे. गेल्यावर्षीपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- मनोज चांदूरकर, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस