वर्धा : जिल्ह्यात डेंग्यूची साथ सुरू आहे. यावर प्रतिबंध लावण्यात आरोग्य विभागाला अपयश येत आहे. आरोग्य विभाग औषधोपचार करीत आहे. केवळ औषधोपचार करून यावर आळा मिळविणे शक्य नाही तर स्वच्छता हा एकमेव उपाय असल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले; मात्र येथील गामपंचायतीच्यावतीने याकडे दुर्लक्ष होत असल्याने काही ग्रामपंचायत सदस्यांनी स्वत: फवारणी पंप विकत आणून गावात फावारणी केली. ग्रा. पं. सावंगी (मेघे) क्षेत्रातील वॉर्ड क्र. ३ व ४ मध्ये अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यातही एकाचा मृत्यू झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असतानाही सावंगी (मेघे) ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे काही सदस्यांनी वर्गणी गोळा करून फवारणी पंप खरेदी केले. केवळ पंपच नाही तर औषधी खरेदी करून त्याची गावात फवारणी केली. पावसाळ्यापूर्वी ग्रा. पं. सावंगी (मेघे) प्रशासनाने गावामध्ये स्वच्छता मोहीत राबविली नाही. गावातील नाल्या तुंबल्या आहेत. गावांमध्ये आरोग्य जागृतीची मोहीम राबविणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे, असे उपक्रमही राबविण्यात आले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळेच गावात डेंग्यूच्या आजाराची साथ पसरल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यामुळे अखेर ग्रा. पं. सदस्यांनी फवारणी यंत्र घेऊन प्रत्येक वॉर्डात फवारणी सुरू केली आहे. या संदर्भात ग्रा. पं. सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी यांना गट विकास अधिकारी वर्धा यांना तक्रारी दिल्या आहेत. गावात फवारणी करण्याकरिता माजी सरपंच उमेश जिंदे, ग्रा. पं. सदस्य अमरजित फुसाटे, समाधान पाटील, महेंद्र गेडाम, रमा सोनपितळे, सरिता पारधी, वनिता जाधव, मीनाक्षी जिन्दे यांनी पुढाकार घेतला. त्यांना गावकऱ्यांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)
अन् ग्रामपंचायत सदस्यांनीच घेतले खांद्यावर फवारणी पंप
By admin | Published: October 08, 2014 11:29 PM