लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ग्रामीण भागातील गावपातळीवर विकासाच्या दृष्टीने काम करणारी महत्त्वात्ची संस्था म्हणून ग्रामपंचायतींना विशेष महत्त्व आहे. गावांचा विकास आणि ग्रामस्थांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे या विकासात्मक कामाला चालना देण्याकरिता ग्रामपंचायतीची स्वतंत्र इमारत असणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता गावात चांगले ग्रामपंचायत भवन उभे राहावे, याकरिता शासनाने बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी देण्याची तरतूद केली आहे.
जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकणू १३८६ गावे असून या गावांचा विकास करण्याची जबाबदारी एकूण ५२१ ग्रामपंचायतींची आहेत. जिल्ह्यात ५२१ ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामविकास साधला जात आहे. यापैकी सात ग्रामपंचायतींना ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत नसून त्यांच्याकडून निधीची मागणी करण्यात आली आहे. विशेषत: ग्रामपंचायतींकडे इमारत असून ती जीर्ण झाली आहे किंवा वाढत्या लोकसंख्येमुळे त्या इमारतीतून काम करण्यास ती अपुरी पडत असल्याने नवीन ग्रामपंचायत भवनाची मागणी केली जात आहे. या शासनाकडून निधी प्राप्त होताच या ग्रामपंचायतींच्या इमारतीही साकार होणार आहे. शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्वी १५ ते २० लाखांचाच निधी उपलब्ध होत होता. मात्र, आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी देण्याची तरतूद असल्याने या निधीतून सुसज्ज अशी इमारत साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२५ लाखापर्यंत इमारतींसाठी निधी ग्रामपंचायतींना शासनाच्या बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामाकरिता मिळतो. ज्या गावांची लोकसंख्या २ हजारांवर आहे, त्यांच्याकरिता हा निधी असून, २ हजारांपेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातील ग्रामपंचायतीकरिता २० लाख रुपये दिले जातात. जिल्ह्यात वर्धा तालुक्यातील सालोड (हिरापूर) व आर्वी तालुक्यातील जळगाव ग्रामपंचायतीचा यामध्ये समावेश आहे.
जिल्ह्यामध्ये एकूण ५२१ ग्रामपंचायती असून यापैकी सात ग्रामपंचायतींकडे सुसज्ज इमारत नसल्याची माहिती उपलब्ध आहे. शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत भवनाकरिता निधी उपलब्ध करून दिला जातो. आता बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेअंतर्गत २५ लाखांपर्यंत निधी उपलब्ध होत असून, त्याला गावाच्या लोकसंख्येची अट घातली आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच राहिलेल्या ग्रामपंचायतींना इमारत बांधकामाकरिता निधी दिला जाईल.- डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जि.प. वर्धा.
कोणत्या ग्रामपंयातींना नाही इमारतजिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये एकूण ५२१ ग्रामपंचायती असून, यापैकी दहा ग्रामपंचा यतींना ग्रामपंचायत भवन नव्हते. नुकताच आष्टी तालुक्यातील परसोडा आणि समुद्रपूर तालुक्यातील लसनपूर व लाहोरी येथील ग्रामपंचायतींना भवन मिळाले आहे. आता देवळी तालुक्यातील कोळोणा (चोरे), खातखेडा, आर्वी तालुक्यातील वाढोणा (ठाकरे) व पिपरी पुनर्वसन, आष्टी तालुक्यातील खडका, कारंजा तालुक्यातील मेठहिरजी व समुद्रपूर तालुक्यातील कवठा या सात गावांमध्ये ग्रामपंचायत भवनाची आवश्यकता आहे.