ग्रामस्थांमध्ये संताप : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप अधांतरीच वर्धा : स्वातंत्रदिनी विविध मुद्यांवर चर्चा होऊन सुरू झालेली पवनार येथील ग्रामसभा वादळी ठरली. या सभेत चौदाव्या वित्त आयोगातून करावयाच्या कामांबाबतचे अनेक ठराव मंजूर झाले. परंतु गावातील मुख्य समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. त्यावर चर्चा करून तोडगा निघण्याआधीच सरपंच व सचिवांनी सभा गुंडाळली. त्यामुळे रोष व्यक्त होऊन नव्याने ग्रामसभा घेण्याचा मानस अनेकांनी यावेळी बोलून दाखविला. येथील सरपंच अजय गांडोळे, सचिव जोगे यांनी चौदाव्या वित्त आयोगांतर्गत करावयाची कामे तसेच प्रस्तावित असलेल्या विकासकांमांबाबत माहिती दिली. ही बाब ग्रामस्थांना मान्य असली तरी गावातील मुलभूत समस्या अद्यापही सुटलेल्या नाहीत. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. गावात नव्याने जलशुद्धीकरण बांधण्यात आले आहे. परंतु पाईपलाईनची व्यवस्था सदोष असल्याने अद्यापही ग्रामस्थांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी संघर्षच करावा लागत आहे. २६ जानेवारी रोजी झालेल्या ग्रामसभेतच १२ फेब्रुवारी २०१६ पासून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळेल असे आश्वासन खुद्द सरपंचांनीच दिले होते. अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. सदोष कामामुळे ग्रामपंचायतने ही पाणीपुरवठा योजना स्वत:कडे घेतलेली नाही. त्याचप्रमाणे गावातील मोकाट वराहांचा प्रश्न, मटन मार्केट हटविण्याचा मुद्दा असे अनेक प्रश्न कित्येक वर्षांपासून प्रलंबित आहेत. याबाबत ग्रामस्थांनी प्रश्नांची जंत्री सुरू करताच एका नेत्याच्या स्वागतासाठी सदर ग्रामसभा अर्ध्यावरच गुंडाळण्यात आली. संतप्त ग्रामस्थांनी बराच वेळ नारेबाजी केली. गावातील एकाही समस्येवर ठोस चर्चा न झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त करीत पुन्हा ग्रामसभा घेण्याचा मानस व्यक्त केला.(शहर प्रतिनिधी)
ग्रामसभा गुंडाळून ‘अर्ध्यावरती डाव सोडीला’
By admin | Published: August 17, 2016 12:39 AM