लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची जिल्हा कार्यकारिणी व समुद्रपूर तालुका शाखेच्या वतीने स्वयंघोषित समाजसेविका मंदा ठवरे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सविस्तर वृत्त असे की, मंदा ठवरे या स्वत:ला समाजसेविका म्हणून घेतात व त्याच अनुषंगाने तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतींमध्ये अवैधरित्या ग्रामसभेमध्ये शिरून उपस्थित लोकांची दिशाभूल करतात. परिणामत: गावातील शांतता व सुव्यवस्था विस्कळीत होत असून त्यांचा प्रशासकीय कार्यात वाढलेला अवैध हस्तक्षेप प्रशासकीय कार्यात अडथळा निर्माण करीत आहे.मंदा ठवरे गावागावांत जात बचत गटाच्या नावाखाली महिलांना ग्रामप्रशासनाच्या विरोधात भडकावितात तसेच गावातील नागरिकांना घरकुल देणे, अतिक्रमण धारकांना पट्टा देणे, निराधारांना अनुदान सुरू करणे या बाबीवरून लोकांना प्रलोभन देऊन प्रशासनाच्या विरोधात जनभावना भडकावत आहते. सोबतच मला मुख्य कार्यपालन अधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांनी पाठविल्याचे सांगून लोकांची दिशाभूल करून मतदार नसतानाही अवैधरीत्या ग्रामसभेत प्रवेश करून माहिलांना ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाविरोधात भडकावून गोंधळ घालतात. ग्रामपंचायत, प्रशासनास वार्षिक ७० ते ८० लाख रुपये येत असतात, अशी चुकीची माहिती ग्रामस्थांना देऊन गोंधळाचे वातावरण निर्माण करतात. या अगोदरसुद्धा या तथाकथित समाजसेविकेने ग्रामपंचायत गिरड, डोंगरगाव, वासी व तालुक्यातील इतरही ग्रामपंचायतींमध्ये अवैधरीत्या शिरून ग्रामस्थांना खोटी माहिती सांगून दिशाभूल केलेली आहे, याबाबतची तक्रार तहसीलदार, ठाणेदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. अनधिकृत हस्तक्षेपामुळे ग्रामपातळीवरील वातावरण कलुषित होत असून ग्रामसभेतील सरपंच, सचिव व इतर पदाधिकाºयांसोबत कुठलाही अनुचित प्रकार घडून येऊ शकतो. ग्रामसभेत उपस्थित असलेल्या पोलिसांना सरपंच व सचिवांना अर्वाच्य भाषेत बोलत असल्याने प्रशासकीय कार्य कसे करावे, असा पेच निर्माण झालेला आहे.या माहिलेने तालुक्यातील २० ते २५ ग्रामपंचायतींमध्ये धुमाकुळ घालण्याचा प्रकार घडलेला आहे. त्यांच्या या कृत्यामुळे ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असून त्वरित बंदोबस्त करावा; अन्यथा ग्रामसेवक ग्रामसभेवर बहिष्कार टाकेल व सभेला उपस्थित राहणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष हेमंत भोमले, सचिव प्रवीण खोंडे, राज्य लेखा परीक्षक कैलास बर्धिया, कार्यकारी अध्यक्ष वासुदेव रोहणकर, तालुकाध्यक्ष नरेंद्र जामुनकर, सचिव प्रवीण बालमवार व इतर ग्रामसेवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मंदा ठवरे यांच्याविरोधात एकवटले ग्रामसेवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 11:42 PM
महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनची जिल्हा कार्यकारिणी व समुद्रपूर तालुका शाखेच्या वतीने स्वयंघोषित समाजसेविका मंदा ठवरे यांच्याविरोधात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
ठळक मुद्देकार्यवाही न झाल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा