मोकाट जनावरांवर ओढवतोय मृत्यू : गोपालकांनी दक्षता घेणे गरजेचे वर्धा : प्राणिमात्रावर प्रेम करणे ही फार चांगली बाब आहे; पण पुरेशी व्यवस्था न करता प्राण्यांचे हाल केले जात असल्याचे दिसून येते. यात आपली गुरे मोकाट सोडून त्यांचे आरोग्य खराब केले जात आहे. बुधवारी पिपल फॉर अॅनिमल्सच्या करुणाश्रममध्ये एका गाईचा मृत्यू झाला. गाईच्या पोटातून २५ ते ३० किलो प्लास्टिक निघाले. यामुळे मोकाट सोडलेल्या जनावरांकरिता प्लास्टीक कर्दनकाळच ठरत आहे. शहरात मोकाट फिरणाऱ्या गाई, बैलांना जेरबंद करण्याची मोहीम नगर परिषद प्रशासन एक महिन्यापासून राबवित आहे. यात जनावरे पकडून पिपल फॉर अॅनिमल्सद्वारे संचालित पशु अनाथ आश्रमात ठेवण्यात येत आहे. या प्रकरणी पशु मालकांकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात आहे. यामुळे बहुतांश पशुपालक घरी जनावरे ठेवण्याची व्यवस्था नसल्याने ती सोडवत नाहीत. या जनावरांना शहरात कचरा खाण्याची सवय जडलेली असते. यामुळे ही जनावरे हिरवा वा सुखा चारा खात नाही. कालांतराने कमजोरी येऊन गुरे खाली बसतात व बरेचदा या गुरांचा मृत्यूही होतो. यातीलच एक गाय करुणाश्रमात बुधवारी दगावली. शवविच्छेदनात सुमारे २५ ते ३० किलो प्लास्टिकचा कचरा गाईच्या पोटातून निघाला. यामुळे गोपालकांनी घरी गाई पाळताना केवळ श्रद्धेपोटी न पाळता त्यांच्या सकस आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे. असे झाले तरच गोसेवा होऊ शकते. शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना सडका भाजीपाला व कचरा खाण्याची सवय असल्याने गोठ्यात टाकलेला हिरवा चाराही ही जनावरे खात नाही. यामुळे पशुपालकांनी आपली पाळीव जनावरे मोकाट न सोडता घरीच काळजी घ्यावी, असे आवाहन पिपल फॉर अॅनिमल व पालिकेने केले आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
प्लास्टिक ठरतेय गुरांसाठी कर्दनकाळ
By admin | Published: August 19, 2016 2:13 AM