दिगंबर पगार : २७ हजार वृक्षप्रेमी झाले वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन चळवळीचे सदस्य लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाचे महत्त्व खऱ्या अर्थाने नागरिकांनी ओळखले पाहिजे. वनखात्याचे महत्त्व सध्याच्या मंत्री महोदयांनी ओळखून महाराष्ट्रात ५० कोटी वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यांच्याच नेतृत्त्वात चित्ररथाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात प्रचार व प्रसाराचे कार्य सुरू आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे चित्ररथ जिल्ह्यात दाखल झाला नसला तरी ५० कोटी वृक्ष लागवड या उपक्रमासाठी जिल्ह्यातील ग्रीन आर्मी सज्ज आहे. जिल्ह्यातील २७ हजार वृक्षप्रेमी ग्रीन आर्मीचे सदस्य झाले असल्याची माहिती उपवनसंरक्षक दिगंबर पगार यांनी दिली. स्थानिक शिवाजी चौक येथे वन विभागाच्यावतीने आयोजित चित्ररथाच्या स्वागतार्थ छोटेखानी कार्यक्रमात शुक्रवारी ते बोलत होते. व्यासपीठावर सहाय्यक वनसंरक्षक आर.के. चव्हाण, सोहम पांड्या, निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे, गडेकर, प्रा. मोहन गुजरकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पगार पुढे म्हणाले, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी जिल्ह्याला १ कोटी ग्रीन आर्मीचे सदस्य करायचे आहेत. युद्धपातळीवर हे काम सुरू आहे. सध्यास्थितीत २७ हजार १४५ सदस्यांची नोंदणी करण्यात आली. या आर्मीत शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचाही समावेश करण्यात येणार आहे. ग्रीन आर्मीचे सदस्य झालेल्यांना विविध सोई-सुविधा देण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. यंदाचा ५० कोटी वृक्षलागवड उपक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रीन आर्मीसह जिल्ह्यातील विविध सामाजिक व सेवाभावी संस्थांचेही सहकार्य घेण्यात येणार आहे. प्रचार-प्रसारासाठी जिल्ह्यात दोन दिवसांकरिता येऊ घातलेला आकर्षक चित्ररथ काही तांत्रिक अडचणींमुळे शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत दाखल होऊ शकला नाही. तो जिल्ह्यातही यावा यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे. चित्ररथ वर्धेत दाखल न झाल्यास वन विभागाच्यावतीने जिल्ह्यातच चित्ररथ तयार करून प्रचार व प्रसार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. सहाय्यक वनसंरक्षक आर. के. चव्हाण यांनी निसर्ग हा उद्धारकर्ता असून त्याचे संगोपन आपण केले पाहिजे. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाच्या चळवळीत प्रत्येक नागरिकाने सहभागी होण्याचे आवाहन केले. सोहम पांड्या यांनी आपण वृक्षसंवर्धनासंबंधी एक आराखडा तयार केला असून तो शासनाला पाठविला आहे. तो शासनाने ग्राह्य धरून पुढील वाटचाल केली तर महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देश हिरवा होईल असे सांगितले. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनाची समाजात जाणीव व जागृती असून प्रभावी कृती होणे बाकी आहे. लग्नाचा किंवा मुलाबाळांचा तसेच स्वत:चा वाढदिवस, लग्न आदी औचित्याने नागरिकांनी वृक्षारोपण केले पाहिजे. केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही तर लावलेल्या वृक्षाचे जतनही त्यांनी केले पाहिजे असे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले. यावेळी प्रा. मोहन गुजरकर, गुरूदेव सेवा मंडळाचे बा.दे. हांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. आयोजित कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी पवार यांच्या नेतृत्त्वात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ६० सदस्यांनी नोंदणी केली ग्रीन आर्मीचे सदस्य होऊ इच्छिणाऱ्यांसाठी कार्यक्रमस्थळी शुक्रवारी दिवसभऱ्यासाठी विशेष केंद्र देण्यात आले होते. दिवसभऱ्यात शिवाजी चौक येथील केंद्रात योगेश पिसे व योगेश मोरस्कर यांनी जवळपास ६० वर्धेकरांची ग्रीन आर्मीचे सदस्य म्हणून नोंदणी करून घेतली. ग्रीन आर्मी सदस्य नोंदणीत सेलू पुढे ग्रीन आर्मी सदस्य नोंदणीचे काम जिल्ह्यात युद्धपातळीवर सुरू आहे. एकूण २७ हजार १४५ जणांनी नोंदणी केली असून यात आर्वी तालुक्यातील २ हजार ५५७, आष्टी (श.) ३२३४, देवळी ७५४, हिंगणघाट २ हजार १५०, कारंजा (घा.) ५ हजार ४३४, समुद्रपूर ३ हजार ६६३, सेलू ५ हजार ९५२ व वर्धा तालुक्यातील ३ हजार ४०१ नागरिकांचा समावेश आहे. शिवाजी चौकात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण शिवाजी चौकात आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाला खासदार रामदास तडस यांनी उपस्थिती दर्शविली नसली तरी त्यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्याचे उपवनसंरक्षक पगार यांनी सांगितले. कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिवाजी चौक परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
जिल्ह्यातील ग्रीन आर्मी ५० कोटी वृक्ष लागवडीसाठी सज्ज
By admin | Published: May 13, 2017 1:17 AM